Sagar Mohalkar : जामखेडमध्ये थरार! कुख्यात गुंडावर भररस्त्यात बेछूट गोळीबार; ७ राऊंड फायर, सागर मोहळकर गंभीर जखमी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा: जामखेड शहरात बुधवारी (४ रोजी) सायंकाळी गोळीबाराच्या (jamkhed golibar) घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. शहरातील नुराणी कॉलनी परिसरात कुख्यात गुंड पैलवान सागर मोहळकर (sagar mohalkar) याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सात राऊंड फायर केले. या जीवघेण्या हल्ल्यात मोहळकर गंभीर जखमी झाला असून जामखेडसह जिल्हाभरात या घटनेने खळबळ उडाली आहे.(ahilyanagar news)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बुधवारी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास नुराणी कॉलनी परिसरात घडली. कुख्यात गुंड सागर मोहळकर हा परिसरात असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याला गाठले. काही समजण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी तब्बल ७ राऊंड फायर केल्याचे बोलले जात आहे. सागर मोहळकरला ४ गोळ्या लागल्या आहेत, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली.

गोळीबाराच्या आवाजाने परिसरात प्रचंड घबराट पसरली. हल्ल्यानंतर मोहळकर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर घटनेनंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे शहरासह संपुर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडालेली आहे.
घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मोहळकरला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे
सागर मोहळकर हा पोलिसांच्या दप्तरी कुख्यात गुंड म्हणून ओळखा जातो. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला वर्षभरापूर्वी जिल्हयातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले होते. नुकताच तो नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. तो शहरात परतताच त्याच्यावर हा हल्ला झाल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पंचनामा करत पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेतील हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत.