जामखेडमध्ये मोठी खळबळ! जिओ पेट्रोल पंप डीलरशिपच्या नावाखाली व्यावसायिकाला ८५ लाखांचा गंडा; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा ; पेट्रोल पंप डीलरशिप किंवा परवाना ( Petrol Pump Dealership) मिळवून देण्याच्या नावाखाली सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक (Scam) करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. अश्याच एका टोळीने जिओ कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून जामखेड येथील एका व्यावसायिकाकडून तब्बल ८५ लाख रुपये उकळत गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

jio petrol pump dealership scam, 84 lakh fraud, cyber crime news, uday gulabrao shinde, rameshwar agency jamkhed, saurabh agarwal,

जामखेडमधील व्यापाऱ्याकडून आरोपींनी डीलरशिप मिळवून देण्याच्या नावाखाली विविध कारणे देत वारंवार पैशांची मागणी केली, मात्र  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सौरभ अग्रवाल आणि शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही) अशा दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह (BNS) माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.

असा घडला संपूर्ण प्रकार

जामखेड येथील बीड रोडवरील मार्केटयार्डसमोर राहणारे आणि ‘रामेश्वर एजन्सी’ नावाचे कृषी सेवा केंद्र चालवणारे उदय गुलाबराव शिंदे (वय ५४) यांनी याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी उदय शिंदे यांच्याशी संपर्क साधून, त्यांना ‘जिओ’ (Jio) कंपनीचा पेट्रोल पंप (Petrol Pump) उभारण्यासाठी अधिकृत डीलरशिप व परवाना मिळवून देतो, असे आमिष दाखवले.

हा परवाना मिळवण्यासाठी विविध स्तरांवरील मंजुरी, प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी डिपॉझिट, कागदपत्रांची छाननी आणि इतर प्रशासकीय शुल्काचे कारण पुढे करत वेळोवेळी मोठ्या रकमांची मागणी केली. डीलरशिप मिळणार या विश्वासापोटी फिर्यादी शिंदे यांनी आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण ८४ लाख ५३ हजार रुपये जमा केले.

वारंवार टाळाटाळ केल्याने संशय बळावला

तब्बल वर्षभर एवढी मोठी रक्कम भरूनही पेट्रोल पंपाची डीलरशिप किंवा कोणताही परवाना मिळाला नाही. फिर्यादींनी आरोपींकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडून वारंवार टाळाटाळ केली जात होती. यामुळे शिंदे यांना संशय आला आणि त्यांनी स्वतःहून सखोल चौकशी केली. तेव्हा आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सायबर पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू

आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उदय शिंदे यांनी तातडीने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून सायबर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सध्या सोशल मीडियावर विविध साईट्सवर व्यवसाय, डीलरशिप किंवा फ्रँचायझी देण्याच्या नावाखाली आकर्षक आणि खोट्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. अशा कोणत्याही आमिषाला बळी पडण्यापूर्वी संबंधित कंपनीची अधिकृत खातरजमा करावी. कोणत्याही अनोळखी बँक खात्यात पैसे भरू नयेत, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.