अवैध पद्धतीने कर्ज वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात धडक कारवाई हाती घ्या – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अवैध पद्धतीने कर्ज वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात धडक कारवाई हाती घ्यावी असे आदेश राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस विभागाला दिले आहेत. (Take stern action against microfinance companies for illegally recovering loans – Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai)

कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बदललेली आहे, अनेकांचा रोजगार गेला आहे,उद्योग व्यवसाय बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता राज्यातील नागरिकांना लागली आहे.

त्यातच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून अवैध पद्धतीने कर्ज वसुली करण्याची मोहीम सुरू आहे.यामुळे अनेक कर्जदार भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचाला अनेक कर्जदार कंटाळून गेले आहेत.

राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या अवैध कर्जवसुली संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आज पार पडली. यावेळी गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी व आमदार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून असभ्य भाषेचा वापर करणे,कर्जदारांना रस्त्यात अडविणे, घरात घुसणे अशा प्रकारचे वर्तन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या, अवैध कर्ज वसुलीबाबत पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.

तक्रारींची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अवैध कर्ज वसुलीबाबतच्या तक्रारींचा अहवाल पोलिस अधीक्षकांनी सादर करावा. हा अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाईल. कंपन्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीला वेळीच आळा घातला पाहिजे, असेही गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

सनदशीर मार्गाने कर्जवसुली न करता ज्या कंपन्या कर्जदारांना अन्यायकारक वागणूक देत आहेत, अशा कंपन्यांविरोधात कर्जदारांनी पोलिसांत तक्रार द्यावी,असे आवाहन गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.