‘अथर्व मला गोळी देऊन शरीरसंबंध ठेवतोय’,आईला फोन अन् काही तासांतच दुर्दैवी अंत; बारामतीत २३ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, होणाऱ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल

बारामती, पुणे : ‘आई, अथर्व मला त्याच्या घरी  घेऊन जात आहे, तो मला गोळी खाण्यास देऊन माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू इच्छितोय’, असं फोनवरून आईला सांगणाऱ्या बारामतीच्या एका तरुणीचा काही तासांतच संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी होणारा नवरा अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

suspicious death of 23-year-old woman in Baramati, case registered against her fiance Atharva Rajendra Mehan

पुण्यात MPSC च्या तयारीदरम्यान जुळलेलं प्रेम, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरलेलं लग्न, पण लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याकडून शरीरसंबंधासाठी दिला जाणारा त्रास एका २३ वर्षीय तरुणीच्या जिवावर बेतला आहे. तरूणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने बारामतीसह पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीने बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पुण्यात एमपीएससीची तयारी करत होती. तेथेच तिची आणि अथर्वची भेट झाली व त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या नात्याविषयी समजल्यानंतर तरुणीच्या आईने तिला बारामतीला बोलावून घेतले.

दोन्ही कुटुंबांची बोलणी होऊन दोघांचे लग्न ठरवण्यात आले होते. लग्न निश्चित झाल्याने आईने तरुणीला अथर्वसोबत फिरण्याची मुभा दिली होती.

मात्र, गेल्या १० ते १५ दिवसांपासून मुलगी सतत शांत आणि गंभीर राहत असल्याचे आईच्या लक्षात आले. आईने मुलीच्या मैत्रिणींकडे चौकशी केली असता, अथर्व हा तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह धरत असून तिला काही गोळ्या देत असल्याची माहिती मैत्रिणींनी दिली.

६ ऑगस्ट रोजी टी.सी. कॉलेजमध्ये एमबीए प्रवेशाच्या कामासाठी गेलेल्या तरुणीला अथर्वने पुन्हा आपल्या घरी नेले. अथर्वच्या गाडीत असतानाच तरुणीने आईला फोन करून घडणारा प्रकार सांगितला.

अथर्व मला त्याच्या घरी नेतोय, तो गोळी देऊन शरीरसंबंध ठेवणार आहे, असं तिने आईला सांगितले. यावर आईने तिला तिकडे न जाता तातडीने घरी परतण्यास सांगितले.या संभाषणानंतर आईने दोन वेळा फोन केला पण तिने उचलला नाही.

त्यानंतर अथर्वच्या मोबाईलवर फोन केला असता मुलीशी बोलणे झाले, मात्र रात्री १० वाजेच्या सुमारास तरुणी रुग्णालयात असल्याचे समजले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

अथर्वने दिलेल्या गोळ्या खाण्यास नकार दिला असतानाही त्याने त्या दिल्यानेच मुलीची प्रकृती बिघडून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणीच्या आईने केला आहे.

या घटनेनंतर आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२५/२०२६, भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०६(१) अन्वये आरोपी अथर्व राजेंद्र मेहन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.