जामखेड टाइम्स वृत्तसेवा: Nagpur Cough Syrup Case : सध्या वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, तापाने आजारी पडणारांची संख्या वाढली आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. खोकला बरा व्हावा यासाठी दिल्या जाणार्या कफ सिरपमुळे मध्य प्रदेश व राजस्थान मध्ये अनेक बालकांचा मृत्यू झालाय. त्यातच आता नागपूर मध्ये उपचार घेत असलेल्या एका १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विषारी कफ सिरपने देशात घेतलेला हा २० वा बळी आहे.

विषारी कफ सिरफच्या सेवनामुळे मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये अत्तापर्यंत एकुण १५ ते २० लहान बालकांचा मृत्यु झाला आहे. आता याचा शिरकाव महाराष्ट्रात झाला आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या धानी डेहरिया या १८ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. विषारी कफ सिरपच्या सेवनामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मृत धानी डेहरिया ही चिमुकली मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिला उपचारासाठी नागपुरला आणण्यात आले होते. किडनी निकामी होऊन मेंदूवर सुज आल्याने तिला नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी कफ सिरपच्या सेवनानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
दरम्यान, कफ सिरपमुळे चिमुकलीच्या मृत्यूनंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयच्या (DMER) पथकाने शासकीय मेडिकल रुग्णालयात पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. DMER च्या चमू मध्ये बीजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ आरती किनीकर, जेजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. छाया वळवी, जे जे महाविद्यालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख भालचंद्र चिकलकर यांच्या समावेश आहे.
यावेळी उपचार सुरू असलेल्या रुग्णांची स्थिती, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि मेडिकल हिस्ट्री तपासण्यात आली आहे. तर ‘एम्स नागपूर’च्या नेतृत्वात केंद्राच्या पथकाने छिंदवाडा जिल्ह्यातील परासीया तालुक्यात जाऊन पाहणी केली आहे. कफ सिरपमुळे सर्वाधिक मुले परासीया तालुक्यातील प्रभावित झाली आहेत. केंद्रीय पथक पुढील तीन दिवसांत आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.
Nagpur Cough Syrup Case : काय आहे विषारी कफ सिरप प्रकरण ?
श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या सेवनामुळे मध्य प्रदेश व राजस्थान राज्यातील १४ लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. नागपुरमध्येही एका बालकाचा मृत झालाय. अत्तापर्यंत देशात १५ बालकांचा मृत्यू झाला आहे.
कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये (Cough Syrup) इथिलीन ग्लायकोल (EG) आणि इथिलीन ग्लायकोल (DEG) चे प्रमाण जास्त असल्याने त्याचा विपरीत दुष्परिणाम बालकांच्या आरोग्यावर झाल्याने १५ बालकांचे बळी गेले आहेत. मध्य प्रदेश सरकारने कोल्ड्रिफ आणि नेक्स्ट्रो डीएस सिरपच्या (Cough Syrup) विक्रीवरही बंदी घातली आहे
सीडीएससीओने सहा राज्यांमधील १९ औषध उत्पादकांवर जोखीम-आधारित तपासणी सुरू केली आहे. मध्य प्रदेश व्यतिरिक्त, राजस्थान आणि महाराष्ट्रानेही मुलांच्या मृत्यूनंतर कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी घातली आहे. केरळ आणि तेलंगणासारख्या राज्यांनीही सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत आणि या सिरपच्या (Cough Syrup) वापरावर बंदी घातली आहे. सीडीएससीओ आणि इतर एजन्सी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
पालकांनो सावधान व्हा.. दक्षता बाळगा.. सतर्क रहा..
दोन वर्षाच्या आतील बालकांना खोकला झाल्यास तज्ञ डाॅक्टरांना दाखवा, त्यांनी लिहून दिलेलेच औषधे वापरा. बंदी असलेले औषध जर कोणी विक्री करत असेल तर तात्काळ प्रशासनाला कळवा.आपल्या बालकांच्या आरोग्याची नीट काळजी घ्या. सतर्क आणि सावधानता बाळगुन कफ सिरप खरेदी करा.जागरूक रहा आणि आपल्या बालकांचे संरक्षण करा. अनावधानाने केलेली छोटीसी चुक जीवघेणी ठरू शकते हे लक्षात ठेवा.