राज्यात जे घडतयं ते पाहून दुश्मन टाळ्या वाजवतोय, शिंदेगटासह भाजपवर शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात कालचा दिवस अभूतपूर्व होता. 1966 पासून ज्या पक्षाने महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्या शिवसेनेच्या अस्तित्वावरच हातोडा पाडला गेला. या निर्णयानंतर राज्यात जे घडलं ते पाहून दुश्मन टाळ्या वाजवतोय, अशी जहरी टीका आजच्या सामनातून भाजपवर करण्यात आली आहे.

Seeing what is happening in Maharashtra enemy is clapping, attack from samna, Shiv Sena strongly attacked BJP along with Shinde group

शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडखोरीतून शिवसेना कोणाची हा वाद पेटला आहे. या वादावर कायदेशीर तोडगा निघण्याआधीच निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याबरोबरच शिवसेना नाव वापरण्यास दोन्ही गटांना मनाई करण्यात आली. या निर्णयामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. मात्र या निर्णयावरून आजच्या सामनातून दुश्मनीची भाषा वापरत शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

मुंबईत दसऱ्याचे दोन मेळावे झाले. तेही शिवसेनेच्याच नावाने. या फुटीचे दर्शन अस्वस्थ करणारे आहे. शिंदे यांच्या मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी प्रचंड खर्च झाला. तरीही गर्दी जिवंत होत नव्हती, असे प्रसिद्ध झाले आहे. शिंदे यांनी हा धोका वेळीच ओळखायला हवा, पण राज्यात जे घडत आहे ते पाहून दुश्मन टाळ्या वाजवतोय”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

“मुंबईसह महाराष्ट्रातील दसरा मेळाव्याचे कवित्व अद्याप संपलेले नाही. महाराष्ट्रात परंपरेने दोन दसरा मेळावे होत आले. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन आणि मेळावा पहिला. शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे घेत असलेला दसरा मेळावा दुसरा. त्यानंतर गोपीनाथ मुंडे भगवान गडावर एक मेळावा घेऊ लागले. तोदेखील दसऱ्यालाच.

आता आणखी एक चौथा मेळावा मुंबईतील ‘बीकेसी मैदानात पार पडला. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाने शिवसेनेला आव्हान देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले. त्यांच्या मेळाव्यासही चांगली गर्दी झाली. शिंद्यांचे प्रमुख भाषण झाले ते उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्णपणे चिखलफेक करणारे. शिवतीर्थ विरुद्ध बीकेसी असा हा सामना पाहून महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीत बसून आनंदाने टाळ्या वाजवीत असतील”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

बाळासाहेबांच्या पार्थिवास अग्नी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी चंपा थापा व रवी म्हात्रे यांना सर्वात पुढे केले होते. अंत्यसंस्काराचे विधी थापा व म्हात्रे यांच्याकडूनच करून घेतले. याबद्दल तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या दिलदारीचे कौतुक झाले.

आज ‘थापा’ शिंदे गटाच्या व्यासपीठावर का गेले? आजही ‘मातोश्रीवर निष्ठने असलेल्या रवी म्हात्रेंकडून शिंदे व त्यांच्या लोकांनी ते समजून घेतले पाहिजे.

शिंदे यांच्या खुर्चीमागेच ‘इव्हेन्ट’ व्यवस्थापकाने थापास उभे केले. जणूकाही शिंदे हे बाळासाहेब ठाकरेच आहेत. या सर्व ढोंगबाजीचा पर्दाफाश बीकेसीच्या मेळाव्यात झाला व शिंदे यांची झाकली मूठ उघड झाली, भाजपलाही तेच हवे असावे, असं म्हणत सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.