Ram Shinde News : सीना धरणाच्या उजव्या कालव्यातून सुटणार आवर्तन, आमदार प्रा.राम शिंदे ॲक्शन मोडवर येताच मिरजगाव परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरातील काही गावांमध्ये पावसाने दडी मारली आहे. यामुळे या भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांचे लक्ष वेधताच आमदार शिंदे हे ॲक्शन मोडवर आले.आमदार शिंदे यांनी तातडीने सीना धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली. प्रशासनाने आमदार शिंदे यांच्या मागणीनुसार सीना उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिरजगाव भागात कर्जत तालुक्यातील सर्वात मोठे सीना धरण आहे. यंदा सीना लाभक्षेत्रात व मिरजगाव परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या सिना धरण कुकडीच्या ओव्हर फ्लो पाण्यातून भरले जात आहे. येत्या 2 किंवा 3 दिवसांत धरण भरणार आहे. मिरजगाव परिसरात अत्यल्प पावसामुळे परिसरातील गावांमधील सिमेंट बंधारे व पाझर तलाव कोरडेठाक आहेत. पाऊस लांबणीवर गेल्यामुळे शेती व जनावरे यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याची बाब निदर्शनास येताच आमदार प्रा.राम शिंदे हे ॲक्शन मोडवर आले.
सीना धरणाच्या उजव्या काल्यातून मिरजगाव परिसरातील गावांना सीना धरणाचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रा राम शिंदे यांनी आज कार्यकारी अभियंता वाळके साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यानंतर शिंदे यांनी अधीक्षक अभियंता सांगळे साहेब यांच्याशी फोनवरून संपर्क करत सदर विषयाकडे लक्ष वेधत आवर्तन सोडण्याची मागणी केली.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर सीना धरणाच्या उजव्या काल्यातून उद्या ०७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आवर्तन सुटण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे मिरजगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आवर्तन सुटणार असल्याचे शेतकरी बांधवांकडून आमदार प्रा.राम शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.