तुकाराम मुंडेंचा बडगा थेट बाॅलीवुडवर! शाहरुख खान, अजय देवगण अन् टायगर श्रॉफ अडचणीत; नेमकं प्रकरण काय?
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/इलायची’ च्या प्रचाराप्रकरणी FDA (अन्न आणि औषध प्रशासन) चे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना दणका देत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुकाराम मुंडे यांच्या रडारवर थेट बॉलीवूड आल्याने संपूर्ण सिनेसृष्टीत आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

वर्ष २०२४ मध्ये ‘विमल’ पान मसाला कंपनीच्या जाहिरातीसाठी हे तिन्ही दिग्गज अभिनेते एकत्र आले होते. या जाहिरातीमुळे विमल ब्रँडशी थेट संबंध जोडले जात असून, हे प्रतिबंधित उत्पादनाचे अप्रत्यक्ष प्रमोशन ठरत असल्याचा आक्षेप एफडीएनं घेतला आहे.
एफडीएच्या कठोर निर्देशानुसार, तिन्ही कलाकारांना या जाहिरातीतील सहभाग तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल आणि वेबसाइटवरून जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर तातडीने काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे.
या कलाकारांवर कायदेशीर कारवाई का करू नये, याबाबतचे सविस्तर लेखी स्पष्टीकरण १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश दिले असून, एफडीएनं कलाकारांकडून एंडोर्समेंट करार, मोहिमेचा तपशील, मानधनाचा तपशील आणि योग्य ती खबरदारी घेतल्याचा पुराव्याच्या पूर्ण प्रती मागितल्या आहेत.
एफडीएच्यावतीने या कायदेशीर नोटीसा संबंधित कलाकारांच्या अधिकृत पत्त्यावर पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये अजय देवगणच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खानच्या वांद्रे येथील मन्नत या निवासस्थानी आणि टायगर श्रॉफच्या ‘टायगर श्रॉफ प्रॉडक्शन्स एलएलपी’ या प्रॉडक्शन हाऊसच्या पत्त्यावर नोटीस बजावण्यात आली आहे.
संबंधित ग्राहक संरक्षण कायद्यांनुसार, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि दोषी आढळल्यास संबंधित कलाकारांवर तीन वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाच्या जाहिराती करण्यास बंदी घातली जाऊ शकते.
एफडीएच्या आयुक्तपदी सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी आपल्या धडाकेबाज शैलीत कारवायांचा सपाटा लावला आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पान मसाल्यावर एफडीएनं अनेक ठिकाणी धाडी सत्र सुरू ठेवले आहे. जाहिरातीचं सादरीकरण, संवाद आणि उत्पादनाचं नाव यांमुळे हे कलाकार ज्या उत्पादनाचा प्रचार करत आहेत, ती तंबाखूशी संबंधित प्रतिबंधित उत्पादनाची अप्रत्यक्ष जाहिरात आहे का, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी FSS कायदा, २००६ च्या कलम ३०(२)(अ) अन्वये १३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या बंदी आदेशानुसार, या उत्पादनाच्या निर्मिती, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षाच्या कालावधीसाठी पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या कठोर भूमिकेमुळे आता बड्या स्टार्सच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.