Earthquake in bhoom Politics : भूमच्या राजकारणात भूकंप : सुरेश कांबळेंनी धरली नवी राजकीय वाट
लवकरच कांबळे हे समर्थकांसह राष्ट्रवादीत दाखल होणार
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महत्वाचे नाव असलेल्या सुर्यकांत ऊर्फ सुरेशभाऊ कांबळे यांनी सत्ताधारी राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा रविवारी भूम येथे आयोजीत बैठकीत केली. कांबळे यांच्या या घोषणेमुळे भूमच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.Earthquake in bhoom Politics Suresh Kamble has taken a new political path

सुरेशभाऊ कांबळे हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील महत्वाचे नाव आहे. सातत्याने सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी धनगर आरक्षणावरून काढलेली पदयात्रा विशेष गाजली होती. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे या यात्रेचा झालेला समारोप राज्यात विशेष चर्चेत आला होता. तुफान गर्दी यावेळी उसळली होती.

कोण आहेत सुरेश कांबळे ?
सुरेशभाऊ कांबळे हे भूम तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचे नाव आहे. कांबळे हे जय हनुमान संघटना व मल्हार आर्मी या दोन सामाजिक संघटनांच्या माध्यमांतून राज्यात सक्रीय आहेत. कांबळे यांनी या दोन सामाजिक संघटनांच्या माध्यमांतून राज्यात मोठे संघटन उभे केले आहे. राज्यात जिथे कुठे अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन कांबळे हे पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी संघर्ष करत आले आहेत. कांबळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भूम तालुक्यासह राज्यातही कांबळे यांच्या संघटनेचे बळ राष्ट्रवादीला मिळणार आहे.(Earthquake in bhoom Politics Suresh Kamble has taken a new political path)
