मोठी कारवाई!अनैतिक व्यापार प्रकरणी श्रीगोंद्यात प्रशासनाचा कारवाईचा बडगा; काष्टी व बनपिंप्रीतील दोन हॉटेल्स बंद करण्याचे आदेश!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा , दि. २१ : श्रीगोंदा तालुक्यात हॉटेलच्या आडून सुरू असलेल्या अनैतिक देह व्यापाराविरोधात प्रशासनाने कारवाईचा मोठा बडगा उगारला आहे. काष्टी येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार आणि बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रिम या दोन आस्थापना बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Major crackdown, Administration takes strict action in case involving illicit activities in Shrigonda, orders issued to shut down two hotels in Kashti and Banpimpri,

पोलीस तपास आणि अहवालामध्ये दोन्ही हॉटेलच्या जागांचा वापर अनैतिक व्यापारासाठी करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम १८ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. श्रीगोंदा-पारनेरचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दोन्ही हॉटेल बंद करण्याचे स्वतंत्र आदेश पारित केले आहेत. या कारवाईने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणून गेले आहेत.

सधन काष्टीला आम्रपालीचा डाग !

अहिल्यानगर-दौंड मार्गावरील काष्टी येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बारमध्ये महिलांना बोलावून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जात होती. त्यानंतर ग्राहक उपलब्ध करून देत पैशांच्या मोबदल्यात महिलांकडून देहव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे प्रशासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

काष्टीच्या आम्रपाली प्रकरणात उरुळी कांचन, चेंबूर, नालासोपारा, वाघोली, वाशी, भिवंडी आणि कोलकाता येथील सात पीडित महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी रणजित राम पुजारी, मुकेशकुमार गुरुदयाल यादव, नागनाथ लक्ष्मण इंगळे, ज्ञानेश्वर रमेश मुळीक, संदीप अशोकराव पाचपुते आणि किर्थिश सुधाकर हेगडे यांच्यासह शिरूर येथील एका ग्राहकाविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुनावणीला संबंधितांची गैरहजेरी

कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांनी आम्रपाली लॉजवर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता. प्रशासनाने संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी १५ आणि १९ जून रोजी सुनावणीची संधी दिली होती. मात्र, संबंधित व्यक्ती दोन्ही सुनावण्यांना गैरहजर राहिल्या.

पोलीस विभागाच्या अहवालानुसार संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक हित आणि कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हॉटेल बंद करणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने नोंदविला. यापूर्वीही संबंधित आस्थापनेचा अशा बेकायदेशीर कृत्यांसाठी वापर झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बनपिंप्रीत सुप्रिम कारवाई!

अहिल्यानगर-सोलापूर मार्गावरील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रिममध्येही अनैतिक व्यापार चालविला जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या ठिकाणी आसाम, गुजरात आणि महाराष्ट्रातील सात महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणण्यात आले होते. या महिलांना हॉटेलमध्ये ठेवून पुरुष ग्राहकांकडून पैसे घेत त्यांच्याकडून देहव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

या प्रकरणी हॉटेलचे चालक आणि मालक किरण रावसाहेब जरे व सुनील नाना पठारे यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३ तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमातील कलम ३, ४, ५ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल सुप्रिमवर कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. संबंधित जागा भाडेकराराने दिली असून तेथे अनैतिक व्यापार करण्यास कोणतीही परवानगी दिलेली नव्हती, असा दावा जागामालकाने केला होता. आजारपणामुळे आपण बाहेरगावी असल्याने या प्रकाराची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या हॉटेलमध्ये केवळ शाकाहारी भोजनाची सुविधा सुरू असून हॉटेल बंद केल्यास कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, असेही त्यांच्याकडून प्रशासनासमोर मांडण्यात आले.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने केवळ गुन्हा दाखल झाल्याच्या आधारावर हॉटेल बंद करू नये, असा युक्तिवादही करण्यात आला होता.
मात्र, पोलीस विभागाच्या अहवालामध्ये संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने हॉटेल बंद करण्याचा आदेश कायम ठेवला.

दोन्ही हॉटेल बंद करण्याच्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करून त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

भविष्यात संबंधित जागांचा पुन्हा अनैतिक व्यापार अथवा कुंटणखान्यासाठी वापर झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मूळ जमीन किंवा घरमालकाची राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

श्रीगोंदा तालुक्यात अनैतिक व्यापारप्रकरणी एकाच वेळी दोन हॉटेलवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे हॉटेल आणि लॉज व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर सर्वसामान्य जनतेने या कारवाईचे स्वागत केले आहे.