साताऱ्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! विजेचा तीव्र शॉक लागून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू; एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंब संपलं
फलटण (सातारा): सातारा जिल्ह्यातून मन सुन्न करणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत भीषण दुर्घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास विजेचा तीव्र शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडलेल्या आपल्याच कुटुंबातील मुख्य सदस्याचे प्राण वाचवण्यासाठी धावलेले इतर तीन सदस्यही यात मृत पावले असून, एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंब संपल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील एका खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ राहणाऱ्या शिंदे कुटुंबावर काळाने घाला घातला. बुधवारी (8 जुलै) पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील प्रमुख सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (45) यांना घराबाहेरील विद्युत वायरमध्ये अचानक आलेल्या प्रवाहाचा जोरदार शॉक लागला. त्यांना शॉक लागल्याचे पाहताच कुटुंबातील इतर सदस्यांनी तात्काळ त्यांच्या दिशेने धाव घेतली.
किसन शिंदे यांना वाचवण्याच्या घाईत गंगुबाई शिंदे (40), सचिन शिंदे (26) आणि आरती शिंदे (24) हे तिघेही एकामागून एक पुढे सरसावले. मात्र, दुर्दैवाने विद्युत प्रवाहाची तीव्रता इतकी जास्त होती की, वाचवण्यासाठी गेलेले हे तिघेही जण त्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले. वीजेचा जोरदार झटका लागल्याने काही क्षणांतच या चौघांचाही घटनास्थळी जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या भीषण घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि मुख्य वीज पुरवठा खंडित केला. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून, चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.
दरम्यान, घराबाहेरील वायरमध्ये अचानक विद्युत प्रवाह कसा उतरला? ही दुर्घटना नेमकी कोणाच्या चुकीमुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे घडली? यामध्ये महावितरणचा काही निष्काळजीपणा होता का? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या सर्व बाबींचा सखोल तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे मृत शिंदे कुटुंबाच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरातून या दुर्घटनेबद्दल तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.