ब्रेकिंग : मुसळधार पावसाने जामखेड तालुक्यात उडवला हाहाकार, रात्रभर तुफान बॅटींग, खैरी धरणाच्या विसर्गात वाढ, नदीकाठच्या गावांसाठी सतर्कतेचा इशारा जारी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील अनेक गावांना रविवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने जोरदार झोडपून काढले.खर्डा भागात पावसाने अक्षरश: हैदोस घातला. जामखेड शहर परिसरालाही पावसाचा जोरदार तडाखा बसला. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे तर काही भागात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. खर्डा परिसर तसेच बालाघाटात आभाळ फाटलं की काय अशीच स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे अनेक गावांमधील नागरिकांनी संपुर्ण रात्र भीतीच्या सावटाखाली जागुन काढली. खैरी धरणातून ११७४५ क्युसेक्स विसर्ग सुरु आहे.

दिघोळमध्ये पावासाचा हाहाकार
सोमवारी पहाटे ५ पर्यंत पावसाची तुफान बॅटींग सुरु होती. दिघोळमध्ये पावसाने मोठी दाणादाण उडवून दिली आहे. गावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. सावता दगडे यांच्या घराला पाण्याचा वेढा पडला आहे. विधाते वस्ती येथे मंदिराला पाणी लागले आहे. त्याचबरोबर मांजरा नदीला मोठा पुर आल्याने नदी पात्र सोडून वाहत आहे. दिघोळमध्ये पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. रात्रीपासून येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. संपूर्ण गाव जागे आहे.
खर्डा येथे अनेक घरात पाणी घुसले आहे. कौतुका नदीला मोठा पुर आला आहे. त्याचबरोबर गोलेकर लवण याठिकाणी ओढ्याला पुर आल्याने वाहतुक बंद झाली आहे.
तर दुसरीकडे खैरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस पडला आहे. यामुळे नदीला महापुर आला आहे. पहाटे चार वाजता बांधखडक येथील पुल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पाच फुट पाणी वाहत असल्याचे वृत्त आहे.
खैरी धरणाच्या विसर्गात वाढ
दरम्यान, खैरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तुफान पावसामुळे खैरी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी दाखल होऊ लागले आहे. त्यामुळे धरणाच्या विसर्गात वाढ झाली आहे. नदीकाठावरील वंजारवाडी, तरडगाव,सोनेगाव, धनेगाव तालुका जामखेड व चिंचपूर बुद्रुक, पांढरेवाडी , शेळगाव या गावांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती खर्डा सिंचन शाखेचे गणेश काळे यांनी दिली.
खैंरी मध्यम प्रकल्प ता. जामखेड
सकाळी. ०४.३० वा.
दिनांक .२२/०९/२०२५
पाणी पातळी. ५६२.७५ मिटर.
आ.उपयुक्त टक्केवारी. १०० %
सांडवा विसर्ग. ११७४५ क्युसेक्स