Flying Officer Damini Deshmukh : दिल्लीतील ध्वजारोहणानंतर बीड जिल्ह्याची कन्या करणार ध्वजावर पुष्पवृष्टी । फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख

Flying Officer Damini Deshmukh : प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

Flying Officer Damini Deshmukh, After the hoisting flag in Delhi daughter of Beed district Damini Deshmukh will shower flowers on the flag,

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या रविवारी (ता. २६) होणाऱ्या वर्धापन दिनी राजपथावर २२ लढाऊ विमाने, ११ वाहतूक विमाने, सात हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलाची तीन डॉर्नियर पाळत ठेवणारी विमाने अशा ४० विमानांद्वारे या वर्षी फ्लायपास्ट दोन टप्प्यांत होईल.याचवेळी एअरफोर्सच्या १४४ जवानांची तुकडी पथसंचलन करणार आहे. या पथसंचलनाचे नेतृत्व करणाऱ्या चौघांच्या फळीत बीड जिल्ह्यातील दामिनी देशमुखचा समावेश आहे.

विशेष म्हणजे कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला मानवंदना देण्यासाठी विमानातून पुष्पवृष्टी करण्याची धुरा एअरफोर्समधील फ्लाईंग लेफ्टनंट असलेल्या दामिनी देशमुख यांच्यावर आहे. बीड जिल्ह्यासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब मानली जात आहे.

परेडच्या समारोपाच्या दुसऱ्या टप्प्यात राफेल, सुखोई, जग्वार सारख्या १२ लढाऊ विमानांचे फॉर्मेशन्स असेल. यावेळी इंडियन एरफोर्सच्या चार अधिकाऱ्यांसह १४४ एअरमनची तुकडी संचलन करेल. तुकडीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये कमांडर महेंद्रसिंग, फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख, फ्लाईट लेफ्टनंट नेपो माेईरंगथेम व फ्लाईंग ऑफीसर अभिनव घोषाल यांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्याची सुकन्या या तुकडीत असणे अभिमानास्पद मानले जात आहे. विशेष म्हणजे राज्यातून देखील दामिनी देशमुख एकमेव यात आहेत. दरम्यान, या संचलनाची मागच्या दोन महिन्यांपासून तयारी सुरु आहे. तयारीतील कामगिरीच्या जोरावर नेतृत्व करणाऱ्या चौघांमध्ये दामिनी देशमुख यांची निवड झाली.

मुळची देवडी (ता. वडवणी) येथील रहिवाशी असलेल्या दामिनी देशमुख या पुणे येथील निवृत्त सह धर्मादाय आयुक्त दिलीपराव देशमुख यांची कन्या आहे. १० वी बोर्ड परीक्षेत ९५.८२ टक्के तर बारावी विज्ञान परीक्षेत ८७.५० टक्के गुण मिळवूनही त्यांनी आवडत्या सैनिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारची इन्स्पायर ही चार लाख रुपयांची शिष्यवृत्तीही सोडली.

दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे.दामिनीने अश्वारोहन, कराटे, योगा, रायफल शूटिंग, खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवले असून कराटेमध्ये ब्लॅक बेल्टची सुवर्णपदक विजेती आहे.

सात वर्षे मुलींच्या सैनिक शाळेत शिक्षण घेत त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळविली. देशपातळीवरील परीक्षेत दिड लाख उमेदवारांमधून निवड झालेल्या २५ मुलींमधून २०१९ मध्ये त्यांची फ्लाईंग ऑफीसर म्हणून निवड झाली. तत्पुर्वी सात वर्षे मुलींच्या सैनिक शाळेत शिक्षण घेत त्यांची २०१९ मध्ये फ्लाईंग ऑफीसर म्हणून निवड झाली.

हैदराबाद येथील एअर फोर्स अॅकॅडमी येथे त्यांनी लढाऊ विमान उडविण्याचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला सिरसा (हरियाणा) येथे फ्लाईंग ऑफीसर म्हणून सेवेनंतर दामिनी देशमुख यांचे फ्लाईंग लेफ्टनंट (कानपूर, उत्तरप्रदेश) येथे पदोन्नती झाली.देशपातळीवरील परेडच्या संचलनाचे नेतृत्व करण्याची दामिनीला संधी मिळाली आहे. बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.