ब्रेकिंग : हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; ३०० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण वाढवून पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र प्राधिकरणा’च्या स्थापनेची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत राज्यात आगामी काळात ३०० कोटी वृक्ष लागवडीचा महासंकल्प सोडण्यात आला असून, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे.

Breaking, Chief Minister Devendra Fadnavis' big announcement for green Maharashtra, resolve to plant 300 crore trees in 2026 to 2031

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘हरित महाराष्ट्र प्राधिकरणा’च्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी त्यांनी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

राज्यातील वनक्षेत्र सध्याच्या तुलनेत वाढवून ते ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे विशेष अभियान जाहीर केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी समन्वयासाठी ‘हरित महाराष्ट्र प्राधिकरण’ स्थापन करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विशेषतः मराठवाड्यासारख्या कमी वृक्षाच्छादन असलेल्या भागाला या मोहिमेत प्राधान्य दिले जाणार आहे.

​मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नियोजन

पहिल्या टप्प्यात २० कोटी वृक्ष: उपलब्ध रोपांनुसार पहिल्या वर्षात सुमारे २० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने बांबू आणि साग लागवडीवर भर दिला जाईल.

डिजिटल देखरेख (Real-time Monitoring): लागवड केलेल्या झाडांच्या जगण्याचे प्रमाण तपासण्यासाठी उपग्रह-आधारित (Satellite-based) रिअल-टाईम प्रणालीचा वापर केला जाईल. यामुळे कामात पारदर्शकता येईल.

१० वर्षांची निगा: झाडे लावून ती केवळ जगवणे नव्हे, तर जोपासणे महत्त्वाचे आहे. यासाठी निगा राखण्याचा कालावधी ३ ते ५ वर्षांवरून वाढवून आता १० वर्षे करण्यात आला आहे.

परिसंस्थेचे रक्षण: स्थानिक हवामानानुसार झाडे लावली जातील. मात्र, गवताळ प्रदेश आणि दलदलीच्या भागात वृक्षारोपण न करता त्यांचे नैसर्गिक पुनर्संचयितीकरण (Restoration) केले जाईल.

​स्टार्टअप्स आणि लोकसहभागातून रोजगार निर्मिती

​मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मोहिमेत तंत्रज्ञान आणि युवकांच्या सहभागावर विशेष भर दिला आहे. ते म्हणाले की, “या क्षेत्रात तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था आणि स्टार्टअप्सनी पुढाकार घ्यावा. स्टार्टअपची इकोसिस्टम तयार करून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देता येईल.”

या उपक्रमात शासकीय रोपवाटिकांसोबतच खासगी नर्सरी आणि महिला बचत गटांना सहभागी करून घेतले जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, तरुण आणि महिलांना आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळेल.

  • ​पर्यावरणीय फायदा 👇
  • या महावृक्षारोपण मोहिमेमुळे केवळ हिरवळ वाढणार नाही, तर:
  • भूजल पातळीत वाढ होईल.
  • मातीची सुपिकता सुधारेल.
  • जैवविविधतेचे रक्षण होईल.

​व्हीबी-जी राम जी, कॅम्पा (CAMPA), कृषी विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून ही मोहीम राबवण्यात येणार असून, प्रत्येक विभागाला ठराविक उद्दिष्टे निश्चित करून देण्यात येणार आहेत.