ब्रेकिंग : मोहरी तलावाच्या सांडव्याला पडले दीडशे ते दोनशे फुट भगदाड, सांडव्याजवळील भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता, नागरिकांनी सतर्क रहावे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रविवारी रात्री बालाघाटात अतिवृष्टीने धुमाकूळ घालत मोठी दाणादाण उडवून दिलीय. यामुळे जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील सर्वच सिंचन प्रकल्प आणि नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खर्डा परिसरातील मोहरी तलाव हाही ओसांडून वाहतोय. मात्र या तलावाबाबत एक धक्कादायक बाब उघडकीस आल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मोहरी परिसरात रविवारी रात्री तुफान पाऊस झाला.मोहरी तलावात प्रचंड वेगाने पाणी आले आहे.आधीच ओव्हर फ्लो असलेल्या या तलावाच्या सांडव्यातून ८ ते १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. सांडव्यावरून प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याने सांडव्याच्या खडकाळ भरावाच्या अक्षरश: चिंधड्या केल्या. भरावाला सुमारे दीडशे ते दोनशे फुट भगदाड पाडले आहे.यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
तलावाच्या सांडव्याच्या भितींजवळ भगदाड पडण्यास १५ ते २० फुट अंतर बाकी आहे. जर भिंतीजवळ भगदाड पडत गेले तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे मोहरी तलाव फुटण्याचा धोका होऊ शकतो. सध्या मोहरी सह तालुक्यात तुफान पाऊस सुरु आहे. आजची रात्र मोहरी तलावाच्या खालील गावांसाठी महत्वाची असणार आहे. तलावाला कुठलाही धोका होऊ नये अशी प्रार्थना तालुक्यातील जनतेकडून केली जात आहे.
मोहरी.तलावाच्या सांडव्याला भगदाड पडल्याचे लक्षात येताच उपाययोजना करण्यासाठी अधिकारी पुढाऱ्यांनी दिवसभर धावपळ केली. पण मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने त्यांना ठोस उपाययोजना काहीच करत्या आल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.