India Day Parade New York 2025 : न्यूयॉर्कमध्ये पार पडली शिवछत्रपतींची भव्य मिरवणूक; छत्रपती फाऊंडेशनचा कीर्तीरथ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : India Day Parade New York 2025 : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त न्यूयॉर्कमध्ये आयोजित इंडिया डे परेड यंदा विशेष ठरली. परेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तीरथ छत्रपती फाऊंडेशन, न्यूयॉर्क यांच्या वतीने सादर करण्यात आला. यावेळी मॅडिसन अव्हेन्यू परिसर भगवामय झाला होता. हे दृश्य पाहून उपस्थित हजारो भारतीय आणि अमेरिकन नागरिक भारावून गेले होते. हा सोहळा १७ ऑगस्ट रोजी पार पडला.

न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक आडम्स यांनी या परेडची सुरुवात केली. मिशिगन राज्याचे खासदार श्री श्री ठाणेदार हे कीर्तीरथावर विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले. त्यांनी रथावरून प्रेक्षकांना अभिवादन केले तसेच परेडचे निरीक्षण केले. परेड ग्रँड मार्शलचा मान अभिनेत्री रश्मीका मंदाना व अभिनेता विजय देवेरकोंडा यांना देण्यात आला

भारताचे न्यूयॉर्कमधील राजदूत बिनया प्रधान यांनी खास गौरवोद्गार काढले. “छत्रपती फाऊंडेशनचा किर्तीरथ दरवर्षी दिमाखदार असतो, पण त्यांच्या सांस्कृतिक कार्यामुळे त्यांचे योगदान अधिक मोलाचे आहे,” असे ते म्हणाले.

कीर्तीरथावर शिवाजी महाराज, जिजाऊ, बाल शिवबा आणि मावळ्यांच्या भूमिका सादर करण्यात आल्या. बालक, महिला व युवकांनी दिमाखदार अभिनय व आकर्षक पोशाखाद्वारे ऐतिहासिक क्षण जिवंत केले.यावेळी ५० हून अधिक वादक असलेल्या ढोल-ताशा पथकाने न्यूयॉर्क शहर दुमदुमून टाकले होते.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाट्यदिग्दर्शक संदेश रेड्डी यांच्या ‘रुद्र डान्स अकॅडमी’च्या लहान मुलींनी लेझीम व विविध नृत्यरचना सादर केल्या. १०० हून अधिक सहभागी कलाकारांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती सातासमुद्रापार जिवंत केला. अमेरिकेत वास्तव्यास असलेले भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली.

New York Parade Life या वृत्तपत्राने छत्रपतींच्या कीर्तीरथाला “Best Float” म्हणून गौरविले. यावेळी लेखात “शिवराज्याचा संदर्भ अमेरिकेच्या लोकशाहीच्या मुळांशी जोडलेला आहे” असे नमूद करण्यात आले.

परेडचे ग्रँड मार्शल म्हणून दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता विजय देवेरकोंडा आणि अभिनेत्री रश्मीका मंदाना यांना गौरविण्यात आले. दोघांच्या उपस्थितीने परेडला अधिक रंगत आली.

गेल्या १५ वर्षांपासून छत्रपती फाऊंडेशन, न्यूयॉर्क या संस्थेतर्फे शिवजयंती, जिजाऊ जयंती, अहिल्यादेवी जयंती, आंबेडकर जयंती अशा अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा संस्थेतर्फे भारतीय दूतावासात शिवजयंतीचे आयोजन झाले होते. या भव्य परेडमुळे फाऊंडेशनच्या मिरवणुकीला अजून एक मानाचा तुरा मिळाला आहे.

फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सच्या पुढाकाराने दरवर्षी इंडिया डे परेड आयोजित केली जाते. यंदा कीर्तीरथाच्या यशस्वी आयोजनासाठी छत्रपती फाऊंडेशनचे १० राज्यांतून आलेले सदस्य, जल्लोश ढोल-ताशा पथक आणि रुद्र डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी अपार मेहनत घेतली.

हजारो भारतीय आणि अमेरिकन नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण मॅडिसन अव्हेन्यू भगवामय झाला होता.स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेली ही मिरवणूक न्यूयॉर्कमध्ये भारतीय सांस्कृतिक शक्तीचे दर्शन घडवून गेली. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय लोक या परेड मधे मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. प्रचंड उत्साहात हजारो भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांच्या जल्लोषात न्यूयॉर्कमधील प्रशस्त मॅडिसन अव्हेन्यू परिसर भगवामय झाला होता.