जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी १७०८ साली बांधलेल्या बारवेचा चौंडी विकास प्रकल्पात समावेश करून जिर्णोद्धार व्हावा – जवळा परिसरातील जनतेची मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जवळा परिसरात उभारलेली बारव आणि परिसरातील मंदिराचे पुरातत्व विभागाकडून जतन होणे आवश्यक आहे. हे जतन करत असताना पर्यटन विभागाकडून या भागाचा विकास व्हावा. या ठिकाणी राज्यभरातील पर्यटकांनी, इतिहास प्रेमींनी यावे याकरिता प्रयत्न होणे आवश्यक आहे. इतिहासातील अमूल्य ठेव्याचे जतन होण्याकरिता सरकारने चौंडी विकास प्रकल्पात जवळा येथील बारव व परिसरातील मंदिराचा समावेश करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

jawala here Punyashlok Ahilya Devi Holkar built Barav in 1708 should be included in Chondi development project and restored - public demand

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अहिल्यादेवींच्या जन्मभूमी अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातही विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील ३०० पुरातन बारवांची दुरूस्ती करण्याची घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. या घोषणेमुळे जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात अहिल्यादेवींनी बांधलेल्या बारवेची दुरूस्ती आणि कायापालट होण्याच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.

jawala here Punyashlok Ahilya Devi Holkar built Barav in 1708 should be included in Chondi development project and restored - public demand

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या राज्यकारभारात संपुर्ण देशभर अनेक ठिकाणी मंदिर, घाट आणि बारव बांधल्या. त्यांचे जन्मगाव चौंडी येथे अहिल्यादेवींनी बांधलेली मंदिरे आणि सीना नदीवर घाट आहे; मात्र बारव नाही. परंतू चौंडीपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी उभारलेली एक पुरातन बारव आहे. या बारवेचा चौंडी विकास प्रकल्पात समावेश करून चौंडीत येणाऱ्या पर्यटकांसह इतिहासप्रेमींना अहिल्यादेवींनी उभारलेली बारव पाहता येईल तसेच बारव परिसरात मंदिराचे दर्शन घेता येईल. चोंडी विकास प्रकल्पाचा विस्तार झाल्यास पर्यटन वाढण्यास मदत होईल यासाठी सामुहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे.

अशी आहे जवळा येथील पुरातन बारव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव श्री क्षेत्र चोंडी पासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर जवळा शिवारात अहिल्यादेंवीनी बांधलेली बारव आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या पुरातन बारवेचे बांधकाम शके १७०८ मध्ये करण्यात आले आहे. या बारवेमध्ये असलेल्या शिलालेखात ” श्रीमंत मातोश्री अहिल्याबाई होळकर यांनी उत्तरायणे वैशाख शुध्द शके १७०८ या विहीरीचे काम रयतेसाठी केले ” असा स्पष्ट उल्लेख आहे.

बारवेचा आकार वरील बाजुने ५० फुट बाय ५० फुट लांबी रूंदीची चौकोनी असून, खाली आतील बाजुने अष्टकोनी आकार आहे. बारवेला मोटेने पाणी उपसा करण्यासाठी मोठी धाव आहे.त्याचबरोबर खाली उतरण्यासाठी शेवटपर्यंत पाय-या आहेत. याच बारवेमध्ये नंदकेश्वर हे शिवलिंग आहे. या बारवेच्या पश्चिमेला पुरातण हेमांडपंथी भैरवनाथ मंदिर आहे. या मदिराच्या बाहेरच्या भिंतीची पडझड झाल्यानंतर लोकसहभागातून या भिंती पुन्हा दगडातच बांधण्यात आल्या आहेत. एकुण आठ दगडी खांबावर उभे असलेल्या भैरवनाथ मंदिराची बांधणी अतिशय आखीव रेखीव आहे.

बारव आणि भैरवनाथ मंदिरालगत अनेक पुरातण मुर्ती पाहायला मिळतात.त्यामध्ये श्री विष्णु, गणपती, हनुमान , सतीशिला यांच्यासह अनेक पुरातण मुर्ती जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.जवळा परिसरात पावसाने ओढ दिल्यास, याच बारवेत फुले सोडत, नंदकेश्वराची मनोभावे आराधना करण्याची गावक-यांची रूढ परंपरा आहे. ती आजही जपली जाते. भैरवनाथ मंदिरात दरवर्षी चैत्र महिण्यात अष्टमी दिवशी जवळा ,मतेवाडी व गोयकरवाडी, बावी, हाळगाव, खरातवाडी येथील भाविक एकत्र येवुन उत्सव साजरा करतात.यानिमित्त नामजागर करण्याबरोबरच भंडारा महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जवळा शिवारात बांधलेल्या या बारवाचे बांधकाम आजही चांगल्या स्थितीत आहे. मात्र बारवाच्या आतील बाजुस पायथ्याशी खालील बांधकामाचे दगड निसटलेले आहेत.त्यामुळे भविष्यात बारवाच्या भींती कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अहिल्यादेवींच्या जन्मभूमी चोंडी गावापासून जवळच असलेल्या जवळा शिवारातील बारवेचा व परिसराचा जिर्णोद्धार करून या भागाचा कायापालट करावा व त्याच बरोबर या भागाचा चोंडी विकास प्रकल्पात समावेश करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.