जामखेड: स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा हळगाव मध्ये उत्साहात प्रारंभ, आरोग्य तपासणी शिबिरात १३० जणांची तपासणी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : स्वस्थ नारी सशक्त परिवार या महत्वाकांक्षी राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ आज (१७ सप्टेंबर) हळगाव येथील आरोग्य उपकेंद्रात मोठ्या उत्साहात करण्यात आला. महिलांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष आरोग्य शिबिरात तब्बल १३० हून अधिक महिला व किशोरवयीन मुलींनी सहभागी होत आरोग्य तपासणी करून घेतली.

या शिबिरात गरोदर माता, स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुलींची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय, कर्करोग, क्षयरोग या आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्याचबरोबर महिलांना पोषण आहार, स्तनपानाचे महत्व, संतुलित जीवनशैली, स्वच्छता आणि आरोग्य शिक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा उद्देश
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात राबवल्या जाणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा उद्देश महिलांचे आरोग्य तपासून कुटुंब सुदृढ करण्याचा आहे. कारण “निरोगी महिला म्हणजे निरोगी कुटुंब”. या पार्श्वभूमीवर गरोदर माता व स्तनदा माता यांच्यासोबतच किशोरवयीन मुलींना सुदृढ ठेवणे, त्यांचे पोषण, आरोग्य व मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी या मोहिमेद्वारे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

या मोहिमेतून
- गरोदर व स्तनदा मातांना आरोग्य तपासणी व पोषण मार्गदर्शन
- किशोरवयीन मुलींची HB तपासणी, आरोग्य शिक्षण
- महिलांची कर्करोग, मधुमेह, बीपी, क्षयरोग तपासणी
- संतुलित आहार, व्यायाम व निरोगी जीवनशैलीबद्दल जनजागृती
- असे विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
हळगाव उपकेंद्रात भरविण्यात आलेल्या या शिबिराला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी प्रत्येक महिलांची तपासणी करून त्यांच्या आरोग्याविषयी समजावून सांगितले. गरोदर मातांना गर्भारपणातील काळजी, योग्य आहार आणि नियमित तपासणीचे महत्व पटवून दिले. तर स्तनदा मातांना स्तनपानाचे फायदे आणि मातृआरोग्य टिकवण्याच्या टिप्स दिल्या. किशोरवयीन मुलींना रक्तक्षय टाळण्यासाठी पोषणयुक्त आहाराचे महत्व समजावून सांगण्यात आले.

या अभियानातून महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढेल, कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारेल आणि समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. महिलांचे आरोग्य सुदृढ राहिल्यास त्या सशक्त होतील आणि त्यातून परिवार अधिक सक्षम, निरोगी व सशक्त बनेल, हा या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, माजी सरपंच राजेंद्र ढवळे, मेडिकल ऑफिसर डाॅ सचिन रेडे, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी रोहिणी येळपणेकर, आशा सुपरवायझर नंदा शिंदे, सुधाकर राख, विस्तार अधिकारी भजनावळे, CHO संजिवनी बारस्कर , आरोग्य सेविका राणी नागरगोजे, आरोग्य सेवक राजेंद्र बांगर, आरोग्य सुपरवायझर सुधाकर राख, आशासेविका हाजरा शेख, छाया कापसे, सुनिता रंधवे, ग्रामपंचायत सदस्या भारती हिरडे, शरद ढवळे, भाऊसाहेब ढवळे, राजुभैय्या सय्यद, महादेव ढवळे,मंजिराम काळे, रोजगार सेवक किसन ढवळे सह आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

.