जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने घेतला दुसरा बळी, गौतम गोरे यांची मृत्यूशी झुंज अपयशी, गोरे कुटूंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी – सावरगाव ग्रामस्थांची मागणी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने दुसरा बळी घेतला आहे. घर कोसळण्याच्या घटनेतील गंभीर जखमी गौतम बाबासाहेब गोरे (रा. सावरगाव) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मयत गोरे यांची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. या कुटूंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी सावरगाव ग्रामस्थांमधुन होत आहे.

जामखेड तालुक्यात सततच्या पावसामुळे घर पडझडीच्या अनेक घटना घडल्या आहेत.घराची भिंत अंगावर कोसळून पिंपळगाव उंडा येथील पारूबाई गव्हाणे या वृध्द महिलेचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सावरगाव येथील गौतम बाबासाहेब गोरे (वय ४०) यांचा मृत्यू झाला आहे. २१ सप्टेंबर रोजी सावरगाव येथे घर कोसळण्याची घटना घडली होती. या घटनेत गोरे गंभीर जखमी झाले होते. नगर येथील खाजगी दवाखान्यातील १० दिवसांच्या उपचारानंतर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि ३० रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मोठ्या शोकाकुल वातावरणात मंगळवारी दुपारी सावरगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे दि. २१ रोजी शनिवारी सायंकाळी गौतम बाबासाहेब गोरे हे रात्री आपल्या घरात कुटुंबासमवेत झोपलेले होते. रविवारी पहाटे साडेचार वाजता त्यांचे घर कोसळले. या घटनेते गौतम बाबासाहेब गोरे (वय ४०), पत्नी सोनाली गौतम गोरे (वय ३५) व मुलगा सार्थक गौतम गोरे (वय १४) हे जखमी झाले. यातील गौतम गोरे गंभीर यांच्या अंगावर बिम कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे.
जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार उडवून दिला आहे. हजारो एकर शेती उध्वस्त झाली आहे. पिके पाण्यात आहेत. रस्ते वाहून गेलेत..काही ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. तलावांचे सांडवे फुटले आहेत, पुलांचे भराव वाहून गेले आहेत. सततच्या अतिमुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. अनेक जनावरे व कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. पंचनामे सुरु आहेत. सरकारने सरसकट पंचनामे करावेत अशी जनतेची मागणी आहे.