जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मराठा अंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा हाती घेतला आहे. संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौर्यावर आहेत. त्यांच्या या दौर्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अश्यातच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जामखेड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील एका महिला सरपंचाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आपल्या सरपंचपदाचा राजीनामा देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
मराठा अंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी या गावात 17 दिवस आमरण उपोषणाचे अंदोलन केले. अंदोलन स्थगित करताना त्यांनी आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली. ही मुदत संपत आली आहे. तत्पुर्वी मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र दौर्यावर आहेत. शुक्रवारी ते जामखेड दौर्यावर होते. मनोज जरांगे पाटील यांचे जामखेड तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. जामखेड शहरात सायंकाळी विराट महासभा पार पडली. तुमच्या सर्वांच्या साथीने मी मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, आपला विजय निश्चित आहे, असे सांगत एकजुटीने रहा, शांततामय मार्गाने अंदोलन चालू ठेवा, असे अवाहन त्यांनी यावेळी केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या महासभेच्या दिवशी जामखेड तालुक्यात एक मोठी घडामोड घडली. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जामखेड तालुक्यातील सोनेगावच्या सरपंच रूपाली पद्माकर बिरंगळ यांनी आक्रमक होत थेट आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या भूमिकेचे सकल मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आले.मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या सर्वच राजकीय पक्षांचा जाहीर निषेध करत सरपंच रूपाली बिरंगळ यांनी संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे.
यावेळी सोनेगावच्या सरपंच रूपाली पद्माकर बिरंगळ यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा देताना जे पत्र लिहले आहे त्यात म्हटले आहे की, प्रत्येक पक्ष मराठा समाजाचा नुसता मतांपुरताच वापर करत आहे. मराठा समाजातील मुलांना शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळत नाही त्यामुळे अनेक तरुणांच्या पिढ्या बरबाद होत चालल्या आहेत.प्रत्येक पक्ष हा निवडणुकीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतो परंतु सत्ता आल्यानंतर त्यांना मराठा समाजाचा विसर पडतो. आजवर प्रत्येक सरकारने मराठा समाजाची निराशाच केलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याच्या निषेधार्थ मी सोनेगावच्या सरपंचपदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.