जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड ग्रामीण रुग्णालयातील आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्याम जाधवर या कर्मचाऱ्याच्या त्रासास कंटाळून एकवटलेल्या जामखेड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जामखेडचे वैद्यकीय अधिक्षक आणि अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे सामुहिक लेखी तक्रारी केल्या होत्या, यावर नेमलेल्या चौकशी समितीने 8 मार्च 2023 रोजी जामखेडला भेट दिली. या भेटीत चौकशी समितीने तक्रारदार कर्मचाऱ्यांचे लेखी जबाब नोंदवून घेतले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ सुवर्णमाला बांगर यांची टीम चौकशीसाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आली होती.
जामखेड ग्रामीण रुग्णालयातील आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्याम जाधवर यांच्या कारनाम्याच्या चर्चा नेहमी ग्रामीण रुग्णालयाच्या वर्तुळात होत असतात. जाधवर हे स्वता:च HOD असल्यासारखे वावरत असल्याचे सातत्याने बोलले जात होते, गेल्या काही महिन्यांपासून जाधवर आणि ग्रामीण रूग्णालयातील सर्व कर्मचारी असा वाद भडकला होता. काही दिवसांपुर्वी तर हा वाद जामखेड पोलिस स्टेशनपर्यंत गेला होता.
जामखेड ग्रामीण रुग्णालयातील 11 कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जामखेडचे वैद्यकीय अधिक्षक यांना 17 फेब्रुवारी 2023 रोजी लेखी तक्रार केली होती. या आधीही अनेक कर्मचाऱ्यांनी जाधवर यांच्या विरोधात लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार 21 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक अहमदनगर यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. यामध्ये अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बाह्य संपर्क डाॅ सुवर्णमाला बांगर, डाॅ राहूल शिंदे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी शिवाजी जाधव यांचा समावेश होता. या समितीने 8 मार्च रोजी जामखेड ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी तक्रारदार कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले. सदर चौकशी समिती श्याम जाधवर यांना वाचविण्यासाठी खटाटोप करताना दिसली.
दरम्यान, जाधवर यांच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जामखेडच्या वैद्यकीय अधीक्षकांनी अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक यांना श्याम जाधवर यांच्याविरोधात कडक कारवाई करावी, असा अहवाल 13 फेब्रुवारी 2023 रोजी पाठवला होता. त्यानुसार अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी श्याम जाधवर यांची कर्जत येथे तात्पुरता स्वरूपात बदलीचे लेखी आदेश 22 फेब्रुवारी 2023 रोजी काढले होते. चौकशी समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असेही या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, जामखेड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी 8 मार्च 2023 रोजी चौकशी समिती जामखेडला येऊन केली. या समितीच्या अहवालानंतर श्याम जाधवर यांच्याविरोधात काय कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
जामखेड ग्रामीण रुग्णालयातील ज्या कर्मचाऱ्यांनी शाम जाधवर यांच्याविरोधात अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक यांना पाठवलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, जामखेड ग्रामीण रुग्णालयाच्या प्रत्येक विभागामध्ये आसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्याम जाधवर हे हस्तक्षेप करतात, आम्हाला, विनाकारण अधिकार नसताना, दवाखान्याचा मी बॉस आहे, मी सांगेन ते काम तुम्ही सर्वांनी कले पाहीजे, नाहीतर मी वरीष्ठ कार्यालयास तक्रार करीन, अशी धमकी देतात व सतत आम्हाला हिणवून रुग्णांसमोर तुम्ही सर्व फुकट पगार घेता असे बोलतात. जेणेकरुन रुग्ण आमच्याबद्दल भडकतील याची सोय करतात.
जाधवर यांच्याकडे एक बंदुक आहे व ती अनधिकृत आहे असे वाटते परंतु ते त्या पिस्तुलाने रुग्णालयात दहशत निर्माण करत आहेत. रुग्णालयासमोर रिक्त असलेल्या वर्ग ४ निवासस्थानामध्ये ते विनापरवानगी राहत असुन तेथे रात्री रात्री इतर गुंड व दारुड्या लोकांना गोळा करून पाटर्या करतात. व रात्री रुग्णालयात कर्तव्यावर असणा-या कर्मचा-यांना स्पष्ट ऐकू जाईल अशा गलीच्छ घाणेरड्या व अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. कर्तव्यावर असणा-या स्त्री कर्मचा-याने काही प्रतिसादर न दिल्यास रात्री अपरात्री पत्र्यावर दरवाजावर दगडे व लाथा मारून चुकीच्या पद्धतीने हातवारे करून अश्लिल भाषेत बोलतात, असेही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.
औषध भांडारातील औषधे तसेच इतर महत्वाची साधन सामुग्री माळी यांच्या संगनमताने सर्व डिपार्टमेंटच्या चाव्या घेवुन आपल्या ताब्यात ठेवतात व त्यातील रुग्णालयीन सामुग्री त्यांच्या ओळखीच्यांना अवैध रितीने देतात. औषधनिर्माण अधिकारी हे औषधीसाठा असुनही देत नाहीत असे सांगुन रुग्णांना औषध निर्माण अधिका-याच्या विरोधात भडकवुन देतात तसेच लॅब मधील एच आय व्ही कीट, युपीटी कीट, व इतर सामाना खाजगी लॅब धाराकांना पुरवतात.
अधिपरीचारीकांनी काही तक्रार केल्यास त्यांना सतत धमकी देतात कि, तुमचे डेपुटेशन कसे टिकते ते पाहतो, सर्वांची बदली राजुर कोतुळ व गडचिरोलीला करतो, येथून हाकलुन देतो. अश्या धमक्या देतात. एक्सरे कक्षामध्ये एक्सरे काढताना व नंतर न्याय वैद्यक बाबीमध्ये हस्तक्षेप करुन त्यांना हवा तसा अहवाल देण्यासाठी दबाव आणतात.
पोलीस खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे माझ्या जवळचे आहेत, तुम्ही माझे कोणीही वाकडे करु शकत नाही,असे वारंवार बोलतात.माझ्याकडे बंदुक आहे, मी एका एकाला जिवे मारीन, माझी तक्रार कोणीही करायची नाही. आणि केलीच तरी मी आणि माझी बायको सगळयांना पैसे देउन मिटवु शकतो. सी. एस. एम.एस बांगर मॅडम, आमदार, मंत्री हे सर्व माझ्या खिशात आहेत माझे काणीही वाकडे करु शकत नाही. अश्या धमक्या श्याम जाधवर हे सर्व कर्मचाऱ्यांना देतात असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर औषध निर्माण अधिकारी ए बी घोडके, स्टाफ नर्स सातपुते एल एम, वनवे एस जी, धोंडे ए ए, वास्कर आर व्ही, स्वाती दिपक गायकवाड, किशोर बोराडे, सविता शिंदे, गणेश वाघमारे, सचिन बेग, शामशंकर जाधव यांच्या सह्या आहेत. दरम्यान आसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्याम जाधवर यांनीही इतर कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. यावरही चौकशी समितीने चौकशी केली.