Rohini Paradhye: रिल्स स्टार रोहिणी पाराध्ये मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा, २५ दिवसानंतर धक्कादायक माहिती समोर !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी आणि आपल्या रिल्सच्या माध्यमातून लोकांना पोटधरून हसवणारी लोकप्रिय रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. तब्बल २५ दिवसानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. सुरुवातीला गूढ वाटणाऱ्या या प्रकरणावरून आता पडदा उठला असून, रोहिणीच्या आत्महत्येला तिचा पतीच जबाबदार असल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर येत आहे.

ज्या हॉटेलच्या किचनमधून रोहिणीने रिल्स बनवून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले, त्याच किचनमध्ये तिने आपल्या आयुष्याचा अत्यंत क्लेशदायक अंत केला होता. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. रोहिणीने आत्महत्या का केली असावी ? हा प्रश्न राज्यात चर्चेत होता. पण आता रोहिणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिचा पती निलेश पाराध्ये याच्याविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिणीच्या वडिलांनी पोलीस चौकीत दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. पती निलेश पाराध्ये हा घरगुती कारणांवरून रोहिणीचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. याच सततच्या जाचाला आणि छळाला कंटाळून रोहिणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या धक्कादायक माहितीमुळे रोहिणीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे रोहिणी आणि तिचा पती निलेश पाराध्ये या दोघांनी मिळून ‘हॉटेल ग्रामपंचायत’ सुरू केले होते. या हॉटेलची ‘ढवरा मटन थाळी’ प्रचंड प्रसिद्ध होती. रोहिणी स्वतः या हॉटेलच्या स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी सांभाळत असे. काम करता करता ती याच हॉटेलमध्ये रिल्स बनवायची आणि तिच्या याच सहजसुंदर अभिनयामुळे ती अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती.
परंतु, या हसऱ्या चेहऱ्यामागे कौटुंबिक छळाचे किती मोठे वादळ दडलेले होते, याची पुसटशी कल्पनाही तिच्या चाहत्यांना नव्हती. गेल्या २६ मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोहिणीने हॉटेलच्या याच स्वयंपाक खोलीत गळफास लावून आपले जीवन संपवले. तिने गळफास घेतल्याचे लक्षात येताच तिला तातडीने मंगळवेढा येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती.
रोहिणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी पती निलेश पाराध्ये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर करत आहेत.
सोशल मीडियावर लाखो लोकांना हसवणारी रोहिणी प्रत्यक्षात मात्र आतून किती खचली होती, या सत्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आता या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.