जामखेड- करमाळा मार्गावर टायर जाळत मराठा बांधवांनी केला सरकारचा निषेध !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अंदोलनास महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी जामखेड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच अनेक गावात साखळी उपोषण करण्यात आले. या शिवाय सरकार विरोधात आक्रमक झालेल्या मराठा समाज बांधवांनी जामखेड- करमाळा मार्गावरील राजेवाडी शिवारातील पेट्रोल पंपासमोर रस्ता रोको करण्यात आला. यावेळी टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे दिसून आले.

या अंदोलनात माजी कृषि अधिकारी सुंदरदास बिरंगळ, निलेश साळूंके, काकासाहेब इकडे, महेश इकडे, दत्ता कुमटकर, योगेश गोरे, दिगांबर गोरे, बाप्पू निंबाळकर, भास्कर डूचे, राजू बारस्कर, राजू बारस्कर, राजू पवार, शिंदे चेअरमन, बाबासाहेब गोरे सह आदी उपस्थित होते. यावेळी अंदोलकांनी एक मराठा.. लाख मराठा.. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो… आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं… देत कसं नाही.. घेतल्याशिवाय राहत नाही.. अश्या घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवला. या अंदोलनामुळे जामखेड- करमाळा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला जामखेड तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या अंदोलनाला जामखेड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला आहे.