जामखेड : ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमाचा जामखेड तालुक्यात शुभारंभ, कृषी विभागाचे अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर, जाणून घेतल्या माळेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या समस्या
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात याव्यात, तसेच विविध योजना आणि पिकांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाची आजपासून राज्यात अंमलबजावणी हाती घेण्यात आली आहे.
जामखेड तालुका कृषी विभागाच्या वतीने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाची सुरूवात मराठवाड्याच्या सरहद्दीवर वसलेल्या माळेवाडी या दुर्गम गावातून करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर आणि त्यांच्या टीमने आज माळेवाडी गावाला भेट देऊन तेथील शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
शेतीत येणाऱ्या समस्यांमुळे शेतकरी अनेकदा टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येचा पर्याय निवडतात. पारंपरिक शेतीबरोबरच सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. याबाबतचे शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या जमिनीत विविध पिकांचे प्रयोग करण्यासाठी धजावत नाहीत. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपायोजना राबविण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.
एक सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत राज्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाचे अधिकारी महिन्यातील ठराविक दिवशी दुर्गम भागातील गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्याचाच भाग म्हणून जामखेड तालुका कृषी विभागाच्या वतीने जामखेड तालुक्यातील माळेवाडी गावात माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाची सुरूवात केली.
जामखेड तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मंडळ कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील, कृषी पर्यवेक्षक कटके सह आदींच्या टीमने जामखेड तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या माळेवाडी गावास भेट दिली. माळेवाडीतील शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेटी देऊन शेतीविषयक येणाऱ्या अडचणी जाणुन घेतल्या. तसेच शासनाकडून त्यांना आवश्यक असणारे मार्गदर्शन किंवा योजना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सद्यस्थितीत शेती करताना व विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणत्य अडचणींचा सामना करावा लागतो याबाबत कृषी विभागाच्या टीमने सविस्तर आढावा घेतला.
पीक कर्जा घेताना विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून वेळेवर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. असे अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या निदर्शनास आणून दिले.शिवारातील पिकांची स्थिती उत्तम आहे. या भागातील शेतकरी कष्टाळू दिसले. शेती तंत्रज्ञानाच्या काही बाबी उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या, भविष्यात नियोजनबद्ध अंमलबजावणी केल्यास शेतीतून मिळणाऱ्या निवड नफ्यात वाढ होऊ शकते ही बाब शेतकऱ्यांना समजावून सांगितली अशी माहिती तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.
जामखेड तालुका कृषी विभागाने माळेवाडी गावात आयोजित केलेल्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमासाठी ईश्वर गवळी, बाबू विधाते, हनुमंत मोहळकर, अशोक बनकर, ज्ञानदेव विधाते, गोकुळ रंधवे, नाना राऊत, श्रीराम राऊत, हनुमंत रंधवे, संभाजी गवळी, धनंजय राऊत, दिपक गवळी, विठ्ठल विधाते, रंगनाथ आवारे, बप्पा राजगुरु, अशोक गिते, ईश्वर विधाते,दत्तात्रय गवळी, माऊली राऊत सह आदी शेतकरी तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.