शेतातील कुंपणाने घेतले पाच बळी; दुर्गा चमत्कारिकरीत्या बचावली,विजेचा शाॅक लागुन अख्खं कुटूंब संपलं, जळगाव जिल्ह्यातील वरखेडी (एरंडोल) गावातील हृदयद्रावक घटना

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावातून थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. मका पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतात लावलेल्या तारेच्या कुंपणातील विद्युत प्रवाहाचा शाॅक लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा करुण अंत झाला आहे. या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह आई-वडील व आजीचा मृत्यू झाला असून, केवळ दोन वर्षांची दुर्गा पावरा ही चिमुरडी चमत्कारिकरीत्या बचावली आहे. या घटनेमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतांची नावे

या दुर्दैवी घटनेत विकास रामलाल पावरा (३५), पत्नी सुमन (३०), मुलगा पवन (४), मुलगी कवल (३) आणि सासू लीलाबाई जमसिंग पावरा (६०) (रा. ओसरणी, जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा मृत्यू झाला.

दुर्घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, मजुरीचे काम करणारे पावरा कुटुंब एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील एका शेतात मुक्कामाला थांबले होते. हे कुटूंब बुधवारी रात्री वरखेडी शिवारातील पायवाटेने जात होते. शेतकरी बंडू युवराज पाटील व अलकाबाई पाटील यांच्या शेतात रानडुकरांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी तारांचे कुंपण लावले होते. या कुंपणात बेकायदेशीररीत्या विजेचा प्रवाह सोडण्यात आला होता. पावरा कुटुंबाचा या तारेस स्पर्श होताच पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी उघडकीस आलेले दृश्य

बुधवारी सकाळी शेतमालक शेतात गेले असता त्यांना मृतदेह दिसले. त्या वेळी एक वर्षांची दुर्गा मृतांच्या शेजारी बसून रडत होती. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला उचलून सांत्वन केले. पोलिसांनी बालिकेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.

शेतमालकावर गुन्हा

प्राथमिक चौकशीत या कुंपणामुळे दोन रानडुकरांचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांना आढळले. शेतातील तार व वायर्स जप्त करण्यात आले आहेत. शेतकरी बंडू पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एरंडोल पोलिस करीत आहेत.

गावभर हळहळ

या घटनेने वरखेडी परिसरात शोककळा पसरली आहे. एका क्षणात कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखले झाले. हे कुटुंब कुठले आहे याची ओळख पटविली जात आहे. माहिती मिळताच तहसीलदार प्रदीप पाटील यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधीकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनात याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.