Sina River flood News : ५३ वर्षानंतर सीना नदीने इतिहास रचला ! जामखेड करमाळा मार्गावरील जवळा आळजापूर पुल गेला पाण्याखाली, वाहतुक बंद!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सीना नदीने रविवारी दिवसभर विनाशकारी महाप्रलयाचे तांडव केले. तीने महापुराचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एक नवा इतिहास रचला. श्रीगोंदा- जामखेड या मार्गावरील आष्टी तालुक्यातील खडकत येथील नवीन पुलाला पाणी लागले होते.तर जामखेड करमाळा मार्गावरील आळजापुर-जवळा पुल तब्बल ५३ वर्षानंतर आज पाण्याखाली गेला आहे. यावरून सीना नदीच्या विनाशकारी महापुराचे रौद्ररूप लक्षात येते. (sina nadi news)

करमाळा व जामखेड या दोन तालुक्यांना जोडण्यासाठी सन १९७२ साली आळजापुर व जवळा हद्दीतील सीना नदीवर भव्य पुल उभारण्यात आला. गेल्या ५३ वर्षांत सीना नदीला अनेकदा पुर आला परंतू हा पुल कधीच पाण्याखाली गेला नव्हता. परंतू शुक्रवारी आणि शनिवारी सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात तुफान अतिवृष्टी झाल्याने सीना आणि तिच्या उभारण्यात महापुर आला होता. रविवारी सायंकाळपर्यंत सीना नदीतून अंदाजे एक लाख क्युसेक पाणी वाहत होते. यामुळे सीना नदीला विनाशकारी महापुर आला होता. सीना नदीच्या आक्राळ विक्राळ रूपामुळे सर्वांनाच धडकी भरली होती.
रविवारी सायंकाळच्या सुमारास सीना नदीने रुद्रावतार धारण करत थेट जवळा – आळजापुर पुल आपल्या कवेत घेतला. काही क्षणात नदीचा पुल पाण्याखाली गेला. या भागात नदीचे पात्र आणी खोलगट आहे. असे असतानाही नदी दोन्ही पात्राबाहेरून प्रचंड वेगाने वाहत होती. १९७२ ला उभारलेल्या पुल पहिल्यांदाच पाण्याखाली गेला. सीना नदीने ५३ वर्षानंतर केलेले तांडव ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक करणारे ठरले आहे.
सीना नदीने रविवारी मोठा कहर केला. नदीला महाभयंकर पुर आल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी गावाला महापुराचा वेढा पडला होता. सायंकाळपर्यंत महापुराचे पाणी संपूर्ण गावात पसरले. विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानाला महापुराच्या पाण्याने वेढा दिला होता. बंगल्यासमोरून गुडघाभर पाणी वाहत आहे. चोंडीत महापुरामुळे हाहाकार उडाला आहे.चोंडीतील पूरग्रस्त भागातील नागरिकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गढी व आश्रमशाळा या दोन ठिकाणी आश्रय घेतला.
कवडगावच्या तीनही भागात पाण्याने वेढा टाकला होता. कवडगाव शिवारात सीना नदी व विंचरणा नदीचा संगम होतो. दोन्ही नद्यांना महापुर आल्याने कवडगाव शिवारात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते.
सीना नदी जवळा शिवारात दाखल होताना नांदणी नदीचा संगम होता. दोन्ही नद्यांना महापुर आला असल्याने जवळा शिवारात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. विंचरणा नदीला महापुर आल्याने रत्नापुर फक्राबाद धानोरा वंजारवाडी व पिंपरखेड येथील पुल पाण्याखाली गेले होते.
आष्टी तालुक्यातील खडकत येथून जाणाऱ्या नॅशनल हायवेवरील नवीन पुलाचा चिटकून सीना वाहत होती. हा पुल पाण्याखाली जाता जात थोडक्यात बचावला. खडकत येथे सीना नदीचे विनाशकारी रौद्ररूप पाहायला मिळत होते.
सीना, विंचरणा, नांदणी, खैरी, मांजरा या नद्यांना आलेल्या महापुरामुळे जामखेड तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे.