शशीकांत देशमुख यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : शहरातील नामांकित पत्रकार शशीकांत देशमुख यांची दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या प्रसिध्द शैक्षणिक संस्थेच्या सेक्रेटरीपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. संस्थेचे सेक्रेटरी मोरेश्वर देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर शशीकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Shashikant Deshmukh elected as Secretary of The People’s Education Society)

शशिकांत देशमुख हे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेसोबत गेल्या वीस वर्षांपासून निगडीत आहेत. यापुर्वी त्यांनी संस्थेच्या पाँलिटेक्निक काँलेजचे अधिक्षक म्हणूनही अनेक वर्ष काम पाहिलेले आहे. तसेच जामखेड येथील लोकमान्य तालुका वाचनालयावर संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.

शशीकांत देशमुख यांनी सतरा वर्षे जामखेडच्या पत्रकारितेत आपल्या लेखणीचा वेगळाच ठसा उमटवला आहे. अभ्यासु पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. या काळात त्यांनी सकाळ, लोकमत, फुलोरा, काँलेज कट्टा, जामखेड समाचार आदी वृत्तपत्रासाठी पत्रकार व संपादक म्हणून काम केले आहे. शहरातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्थांशी देशमुख हे निगडित आहेत.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या महत्वाच्या पदावर शशीकांत देशमुख यांच्या झालेल्या निवडीमुळे देशमुख यांच्या माध्यमांतून अगामी काळात संस्थेच्या कारभारात नवनवे सृजनात्मक प्रयोग पहायला मिळणार आहे. संस्थेचा जामखेडसह हळगाव, साकत व राजुरी या ठिकाणी विस्तार आहे. ग्रामीण भागातील विद्यालयांची गुणवत्ता वाढीसाठी देशमुख यांनी अधिक लक्ष घालणे आवश्यक आहे. देशमुख यांच्या पुढाकारातून अगामी काळात संस्था कोणते नवे प्रयोग करणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.