Rohit Pawar : रोहित पवारांच्या ‘त्या’ कृतीमुळे पोलिस बाॅईज संघटना आक्रमक, सरकारकडे केली मोठी मागणी, नेमकं प्रकरण काय ? जाणून घ्या
मुंबई : पावसाळी अधिवेशनात गुरुवारचा दिवस आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) व आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीने गाजला.या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत.सोशल मीडियावर या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.विधानभवन (Vidhan bhavan) परिसरातील हाणामारीच्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच या घटनेनंतर Nitin Deshmukh या कार्यकर्त्याच्या शोधासाठी पहाटेपर्यंत मुंबईत (Mumbai) राडा झाल्याचे समोर आले आहे. याचवेळी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका पीएसआयला (PSI) दमबाजी केल्याची घटना समोर आली आहे.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका पीएसआयला (PSI) दमबाजी केल्याची पडसाद आता उमटू लागले आहेत. पोलीस बॉईज संघटना रोहित पवारांविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.आमदार रोहित पवार यांच्यावर 353 नुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केली आहे.
राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन्स घेऊन येता का? असा सवाल राहुल दुबाले यांनी उपस्थित केलाय. शरद पवार कधीच कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला वाकड्या शब्दात बोलले नाही. मात्र रोहित पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. वारंवार पोलिसांना टारगेट केल्या जाणाऱ्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर पोलीस बॉईज संघटनेकडून निदर्शने केली जाणार असल्याची माहिती राहुल दुबाले यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यातील वाद कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंत पोहोचला. विधिमंडळात दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक खटके उडत असतानाच, गुरुवारी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या प्रकारानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनातून अटक केली. देशमुख याच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसह विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आमदार रोहित पवार देखील आव्हाडांसोबत उपस्थित होते.
रोहित पवारांची पोलिसाला दमबाजी
आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर रोहित पवारही संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत रोहित पवार पोलिसांना दमबाजी करताना दिसत आहेत. या व्हिडीओत ते पोलिसांना म्हणतात की, “हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा. शहाणपण करू नका. हात खाली. सांगतोय तुम्हाला. नीट बोलता येत नसेल तर बोलायचं नाही. आमदाराला हात लावायचा नाही. हातवारे करू नका,” असे त्यांनी म्हटले होते.
रोहित पवारांनी पोलिस अधिकाऱ्याला दमबाजी केल्याचे पडसाद आज उमटू लागले आहेत. पोलीस बॉईज संघटना रोहित पवारांविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. संघटनेने आमदार रोहित पवारांवर 353 नुसार गुन्हा दाखल करावा अशी मोठी मागणी सरकारकडे केली आहे.