जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मातृत्व म्हणजे नुसते जन्म देणे नाही, तर आपल्या मुलाच्या यशस्वी वाटचालीत प्रत्येक क्षणी त्याच्या पाठीशी उभे राहणे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यासाठी आजचा दिवस खास ठरला, कारण त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या त्यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे (Bhamabai Shinde) यांनी आज विधानभवनातील त्यांच्या कार्यालयाला भेट दिली. हे दृश्य केवळ एक औपचारिक भेट नव्हती, तर एका आईचा आपल्या मुलाच्या यशाचा गौरव करणारा अत्यंत भावनिक क्षण होता.

साध्या वेशात, नाकात नथ, अंगावर नऊवारी साडी नेसलेल्या भामाबाई शिंदे यांचे आज विधानभवन परिसरात आगमन होताच त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी त्यांची छबी टिपण्यासाठी मीडियावाल्यांची आणि राजकीय कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी अत्यंत आदरपूर्वक आपल्या आईला खुर्चीवर बसवून तिच्या कष्टांना मानाचा मुजरा केला. एक सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आज राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहे, ही गोष्ट त्यांच्या आईसाठी अत्यंत अभिमानाची होती.आपल्या मुलाच्या सभापतीपदाच्या खुर्चीशेजारी त्या बसताच त्यांच्या डोळ्यांतून अभिमानाचे अश्रू ओघळले.

या भेटीदरम्यान सभापती शिंदे म्हणाले, “आज मी या खुर्चीवर बसलोय, पण त्या मागे आईच्या कष्टांची आणि प्रार्थनांची मोठी छाया आहे. आईने आयुष्यभर कठोर मेहनत करून आम्हाला शिकवलं, घडवलं. आज तिचं आशीर्वादरूप भेट विधानभवनात मिळणं, हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे.”
या भेटीचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून अनेकांनी आईच्या त्यागाला आणि मुलाच्या यशाला सलाम केला आहे. एक आई आपल्या साधेपणात किती मोठं बळ असते, हे या क्षणाने पुन्हा एकदा सिद्घ केलं.
आजच्या या भेटीत केवळ एक नेता नव्हता, तर एक पुत्र होता… आणि त्याच्या शेजारी बसली होती, त्याच्या जीवनाला आकार देणारी आई ! या भावनिक दृश्याची दिवसभर विधानभवन परिसरात व राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली होती.
