Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश, जामखेडमध्ये भाजपची ताकद वाढली !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । कर्जत जामखेडच्या राजकारणात बुधवारी मोठा राजकीय भूकंप झाला. सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त तथा आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली. त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. राजेंद्र पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे कर्जत जामखेडमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त राजेंद्र पवार (आर.डी.पवार) हे जामखेड तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहेत. प्रशासनात उच्च पदावर काम केल्यानंतर ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. प्रशासनात काम करताना पवार यांनी आर डी ग्रुपच्या माध्यमांतून समाजकारणात सक्रीय भूमिका बजावली. वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी मोठे संघटन निर्माण केले. तसेच राजकीयपटावर पडद्याआडून त्यांनी नेहमी निर्णायक भूमिका पार पाडली आहे.

सेवानिवृत्तीनंतर राजेंद्र पवार पाटील हे राजकारणात सक्रिय होणार की इतर मार्ग निवडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.अखेर त्यांनी राजकीय मैदानात शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी भाजपाची निवड केली आहे. विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील त्यांनी बुधवारी भाजपात जाहीर प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त राजेंद्र पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठा मित्र परिवार आणि नातेवाईकांचा मोठा गोतवळा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते आर डी ग्रुपच्या माध्यमांतून समाजकारणात सक्रीय आहेत. आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत आर डी ग्रुपने नेहमीच निर्णायक भूमिका बजावलेली आहे.आर डी ग्रुपचा आशिर्वाद ज्या उमेदवाराला तो विजयी होतो, अशी आजवरची स्थिती राहिलेली आहे.

राजेंद्र पवार हे प्रशासकीय सेवेत असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष निवडणूकीच्या मैदानात उतरता येत नव्हते, परंतू त्यांच्या पत्नी राजकीय वर्तुळात सक्रीय असायच्या. त्यांनी २०१७ ते २०२२ या काळात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक म्हणून काम पाहिले. जिजामाता पतसंस्थेच्या त्या विद्यमान चेअरमन आहेत. तर राजेंद्र पवार हे मुंजोबा सोसायटीचे मुख्य प्रवर्तक तसेच जिजामाता पतसंस्थेचे संस्थापक आहेत.

सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त तथा आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवार पाटील हे शांत, संयमी, अभ्यासू, प्रशासनाचा गाढा अभ्यास असलेले नेतृत्व आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांत आर डी ग्रुपच्या माध्यमांतून मोठी मोट बांधून आपली राजकीय ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे. राजेंद्र पवार यांच्या भाजपा प्रवेशामुळे कर्जत-जामखेडमधील राजकीय समीकरणे बदलली आहे. पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजप पर्यायाने प्रा राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढली आहे.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला आर डी ग्रुपचा मोठा फायदा होणार आहे.
