PSI Success story : याला म्हणायची जिद्द अन चिकाटी, ध्येयवेड्या ज्ञानेश्वर 20 वेळा हरला पण पठ्ठ्याने 21 व्या वेळी स्पर्धा परीक्षेत बाजी मारलीच !
नाशिक, ७ जूलै २०२३, जामखेड टाइम्स वृत्तसेवा: PSI Success story : कोणतही यश मिळवायचं असेल तर त्यासाठी संघर्ष हा ठरलेलाच असतो, पण संघर्ष करायचा तरी किती ? यालाही काही मर्यादा असतात, परंतु सलग 21 वेळा विविध स्पर्धा परीक्षा देऊनही तो खचला नाही, नैराश्यात गेला नाही, कुठल्याही परिस्थितीत सरकारी अधिकारी व्हायचचं या जिद्दीने पेटलेल्या ज्ञानेश्वरला अखेर पांडुरंग पावला.जिद्द अन चिकाटीने यशाला त्याने गवसणी घातली. ही प्रेरणादायी कहाणी आहे, ज्ञानेश्वर पांडुरंग सानप (PSI Dnayneshwar Pandurang Sanap) या ध्येयवेड्या तरूणाची.
राज्य लोकसेवा आयोगाने नुकताच पीएसआय संवर्गाचा निकाल जाहीर केला. या निकालात ज्ञानेश्वर पांडुरंग सानप (Dnayneshwar Pandurang Sanap) तरूणाने बाजी मारली. ज्ञानेश्वर सानप आता पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. त्याचा इथपर्यंतचा प्रवास रंजक असा आहे. याच प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.
ज्ञानेश्वर पांडुरंग सानप हा नाशिक जिल्ह्यातील कणकोरी तालुका सिन्नर येथील रहिवासी आहे. हा परिसर तसा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. ज्ञानेश्वरचे दहावीपर्यंतचे शिक्षण मत्हळ बुद्रूक येथे घेतले. त्यानंतर दोडीला येथे बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेऊन अहमदनगर येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.परंतू गेल्या 9 वर्षांपासून तो शेतीतच रमला होता. घरच्या कोरडवाहू शेतातील कामे करत त्याने स्पर्धा परिक्षाचा अभ्यास सुरु करण्याचा निर्णय घेतला.
घरची परिस्थिती बेताचीच, आई मंदा सानप कोरडवाहू शेतात मजुरी करतात, भाऊ वाळूच्या गाडीवर कामावर जायचा, अश्या परिस्थितीत ज्ञानेश्वरला स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अडचणी यायच्या, अश्यातच त्याला मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या माधव आव्हाड यांची मोठी मदत झाली. त्यांनी त्याचा खर्च उचलला. पण संघर्षाचा वाईट फेरा ज्ञानेश्वरच्या वाट्याला आला. स्पर्धा परीक्षेत त्याला एक-दोन-तीन नव्हे तर तब्बल 20 वेळा अपयश आले. मात्र 21 व्या प्रयत्नात तो फौजदार झाला. ज्ञानेश्वर सानप हा त्याच्या कणकोरी गावातील पहिला फौजदार झाला आहे. (PSI Dnayneshwar Pandurang Sanap success story)
ज्ञानेश्वर सानप याने सहा वेळा पोलिस उपनिरीक्षक, कक्ष अधिकारी, क्लार्क या परीक्षा तीन वेळा, रेल्वे चार वेळा अश्या वीस वेळा सर्व परिक्षा दिल्या, प्रत्येक वेळी त्याला यशाने हुलकावणी दिली. पण जिद्द अन कठोर मेहनत असेल तर कितीही अपयशाचे रस्ते आडवे आले तर यशाचा मार्ग सापडतोच हेच ज्ञानेश्वरने 21 व्या प्रयत्नात दाखवून दिले आहे. ज्ञानेश्वर आता फौजदार बनला आहे. ज्ञानेश्वरच्या यशाने अख्ख कुटूंब आनंदून गेलं आहे. ज्ञानेश्वरनं आपल्या यशाचं श्रेय आई मंदा सानप व माधव.आव्हाड यांना दिल आहे. त्यांनी वेळोवेळी धीर दिला, लढण्याचं बळ दिल्यानेच यशाला गवसणी घालता आली असं ज्ञानेश्वर प्रामाणिकपणे सांगतो.
फौजदार बनलेला ज्ञानेश्वर सानप हा इंजिनिअर बनलेला तरूण, पण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमांतून करियर करायचं हे त्याने ठरवलं खरं पण त्याला नशिबाच्या सत्वपरिक्षेला सामोरे जावं लागलं, तब्बल 20 वेळा तो स्पर्धा परिक्षेत अपयशी ठरला. पण 21 व्या वेळी त्याच्या जिद्दीसमोर यश झुकले. तो आत फौजदार बनला आहे. हे यश मिळवताना चांगल्या मित्रांची संगत अन अभ्यासात सातत्याने सराव ठेवल्यामुळे यश गाठता आलं, ते यश मिळवताना कठोर सत्वपरीक्षेला सामोरं जावं लागलं असे ज्ञानेश्वर सानप म्हणाला.
“ज्ञानेश्वरने इंजिनिअर झाला. त्याने जेमलं तरी नोकरी करावी असं वाटतं होतं. पण त्याची इच्छा नव्हती. तो एकाच निर्णय ठाम राहिल्याने मी त्याच्या मित्राने साथ दिली. ज्ञानेश्वरने स्वतः इच्छेने फौजदार झाला आहे.” हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. लेकराने माझ्या कष्टांचं चीज केलं अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरच्या आई मंदा सानप यांनी दिली.”