ACB Maharashtra : 2 लाखांचे लाच प्रकरणात वनविभागाचे दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर लाचलुचपत विभागाकडून गुन्हे दाखल
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या शासकीय विभागांमध्ये लाचखोरांचा सुळसुळाट झाला आहे. गत काही दिवसांपासून लाचखोर पकडले जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लाचखोरीत वनविभाग सुध्दा मागे नसल्याचे उघडकीस आले आहे. 1 लाख रूपयांची लाच स्विकारताना वन विभागातील दोन कर्मचाऱ्यांसह एका खाजगी इसमाला रंगेहाथ पकडण्याची धडक कारवाई नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पार पाडली आहे.
एका व्यक्तीच्या भावाविरूध्द वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये शहादा वनपरिक्षेत्र कार्यालयाने गुन्हा दाखल केला होता. सदर अटकेतील संशयित आरोपीस जामीन मिळावा यासाठी मदत करण्यासाठी वनपाल व वनरक्षक यांनी एका खाजगी इसमामार्फत तक्रारदार यांच्याकडे दोन लाखाच्या लाचेची मागणी केली होती. परंतू तडजोडीनंतर ही रक्कम एक लाख रूपये ठरविण्यात आली होती. तसेच सरकारी वकिलासाठी 25 हजाराच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खातरजमा केल्यानंतर तक्रारीत तथ्य आढळले. त्यानंतर एसीबीने वनपाल संजय मोहन पाटील (वय 54), वनरक्षक दीपक दिलीप पाटील (वय 29), खाजगी एजंट नदीम खान पठाण या तिघा लाचखोरांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंके यांच्या टीमने केली. या पथकात पोलिस हवालदार पंकज पळशीकर, पोलिस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रविण महाजन यांचा समावेश होता.