अहिल्यानगरमध्ये राजकीय भूकंप: महाविकास आघाडीला तनपुरेंचा गुलीगत धोका, राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले विरूध्द गोविंद मोकाटे सामना रंगणार
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सोमवारी अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरेंनी थेट भाजपशी घरोबा करत राहूरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. भाजपने राहुरीत प्रबळ विरोधकालाच आपलेसे करत निवडणुकीच्या मैदानात आघाडी घेतली आहे. तर तनपुरेंनी गुलीगत धोका दिल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खतरनाक झटका बसला आहे.

राज्याचे माजी मंत्री तथा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची पोटनिवडणुक पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपने कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना मैदानात उतरवले आहे. कर्डिले यांच्या विरोधात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे असतील असा कयास बांधला जात होता. तश्या हालचाली सुरू होत्या. परंतु ऐनवेळी भगवा गमजा घालून तनपुरेंनी मतदारसंघात यात्रा काढत अपक्ष उमेदवारीची चाचपणी केली. तनपुरे भाजपचे उमेदवार असतील असेही बोलले जायचे परंतू तसे काही घडले नाही. घडले मात्र उलटेच तनपुरेंनी निवडणुकीच्या मैदानातून काढता पाय घेतला आणि कर्डिलेंची वाट सुकर केली.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अखेरच्या क्षणी मोठा ट्विस्ट आला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी केलेले राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. बंद दाराआड चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद घडवून आणल्यानंतर तनपुरे यांनी आश्चर्यकारकरित्या निवडणुकीतून माघार घेतली.
प्राजक्त तनपुरेंच्या राजकीय हालचाली महाविकास आघाडीला पोषक नसल्याचेच महाविकास आघाडीने आधीच हेरले होते. तनपुरेंकडून धोका होणार हे लक्षात येताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दोन एबी फाॅर्म राहुरीत धाडले होते. तनपुरेंनी निवडणुक लढवावी यासाठी महाविकास आघाडीकडून शेवटपर्यंत मनधरणी करण्यात आली. परंतू तनपुरेंनी महाविकास आघाडीला गुलिगत धोका देत थेट निवडणुकीचे मैदानच सोडले. राष्ट्रवादीने तनपुरेंच्या जागी स्थानिक नेते गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली. गोविंद मोकाटे यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.
भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून अक्षय कर्डिले रिंगणात आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपने प्रयत्न केले. परंतु मतदारसंघातील जनतेचे मत लढण्याचे आहे, असे सांगून प्राजक्त तनपुरे यांनी सुरुवातीपासूनच वातावरण तापवले होते. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी अर्ज भरणार की नाही, याबाबत संभ्रम कायम ठेवला होता.
दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दोन तीन बैठका संपन्न होऊन त्यात तनपुरे यांचे नाव अंतिम केले. परंतु सोमवारी कर्डिले यांचा अर्ज भरण्यासाठी आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री विखे पाटील यांनी थेट तनपुरे यांची भेट घेतली. त्यानंतर तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली.
भाजप नेते भेटल्यानंतर तनपुरेंनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्याविषयी विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.तनपुरे यांना भाजपकडून मोठे आश्वासन देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विनंती केल्यामुळे मी माघार घेतली, असे कारण तनपुरे यांनी दिले. या कारणावरून त्यांची भाजपसोबत असलेली जवळीक अधोरेखित होते. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या पॅटर्नची चर्चा रंगली आहे.