“पप्पा, आम्ही मरू… असे करू नका ना!” चॉकलेट अन् वडापावचं आमिष दाखवून जन्मदात्या बापानेच दोन चिमुकल्यांना जायकवाडी कालव्यात फेकलं; पैठण हादरलं!

छत्रपती संभाजीनगर (पैठण): “पप्पा, आम्ही मरू… असे करू नका ना!” चिमुकल्यांच्या या आर्त आक्रोशानेही जन्मदात्या बापाचं काळीज पाझरलं नाही. चॉकलेट अन् वडापावचं आमिष दाखवून एका नराधमाने आपल्या ५ आणि ७ वर्षांच्या दोन निष्पाप मुलांना थेट जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकून दिले. पैठण तालुक्यातील नांदर येथे सोमवारी (ता. १६) रात्री ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. (Paithan Crime News)

Paithan, Nandar, Father throws his two children Jayakwadi canal, crime news today,

श्याम सोमनाथ रोडगे (वय ५) आणि आर्यन सोमनाथ रोडगे (वय ७) अशी या दुर्दैवी चिमुकल्यांची नावे आहेत. तर सोमनाथ दामोदर रोडगे (वय ४०, रा. नांदर, ता. पैठण) असे आरोपी पित्याचे नाव आहे. कालव्यात पाण्याचा वेग जास्त असल्याने अद्याप दोन्ही बालकांचा शोध लागलेला नाही.

चॉकलेटचं आमिष अन् क्रूर कृत्य

सोमनाथ रोडगे याने सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दोन्ही मुलांना बाहेर फिरायला नेण्याचा बहाणा केला. त्यांना चॉकलेट आणि वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवले. दोन्ही मुले आनंदाने वडिलांसोबत स्कूटीवर बसून घराबाहेर पडली. मात्र, सोमनाथने त्यांना नांदर शिवारातील जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर नेले.

शेवटची आर्त विनवणी ठरली निष्फळ

कालव्याजवळ पोहोचताच सोमनाथ दोन्ही चिमुकल्यांना पाण्यात ढकलू लागला. जीवाच्या आकांताने दोन्ही मुलांनी वडिलांकडे याचना केली. “पप्पा, आम्ही मरू… असे करू नका ना!” अशी आर्त विनवणी त्यांनी केली. मात्र, निर्दयी बापाचे मन अजिबात पाझरले नाही. त्याने दोघांनाही भरधाव वाहणाऱ्या कालव्यात फेकून दिले.

शेतकऱ्यांवरच केली दगडफेक

नेमक्या त्याच वेळी काही शेतकरी कालव्यावरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी तिथे आले होते. त्यांनी हा अंगावर शहारे आणणारा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. शेतकऱ्यांनी धाव घेत सोमनाथला जाब विचारला. मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने उलट शेतकऱ्यांनाच शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली.

पोलिसांकडून आरोपी ताब्यात; गुन्ह्याची कबुली

शेतकऱ्यांनी तात्काळ पाचोड पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सोमनाथ रोडगे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.

कालव्यात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

घटनेनंतर रात्रीपासूनच पोलीस आणि नातेवाईकांनी कालव्यात शोधमोहीम सुरू केली आहे. जायकवाडी कालव्याच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. त्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. अद्याप श्याम आणि आर्यन यांचा शोध लागलेला नाही.

परिसरात संताप आणि शोककळा

आपल्या काळजाच्या तुकड्यांचा शोध घेताना आई आणि नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. ज्या हातांनी मुलांना आधार द्यायचा, त्याच हातांनी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने संताप व्यक्त होत आहे. सोमनाथने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पाचोड पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. याबाबतचे वृत्त दैनिक सकाळने दिले आहे.