नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना जलद आणि आनंददायी प्रवास सुविधा प्रदान करेल – प्रा. राम शिंदे
जानखेड टाइम्स वृत्तसेवा: अहिल्यानगर (Ahilyanagar) रेल्वे स्थानकावर १० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ०९ वाजता नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे (Nagpur-Pune Vande Bharat Express) आगमन झाले. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सेवेमुळे विद्यार्थी, व्यापारी व पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा मिळणार असून, वेळ व खर्च वाचणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बेंगळुरू–बेलगावी, अमृतसर–श्री माता वैष्णो देवी कटरा व गाडी क्रमांक ०१००१ नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस या तीन गाड्यांचा ध्वज फडकावून शुभारंभ करण्यात आला.नागपूर – अहिल्यानगर – पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत आणि ढोल – ताश्यांच्या गजरात रविवारी सायंकाळी स्वागत करण्यात आले.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले, परदेशातील रेल्वेच्या तुलनेत वंदे भारत सेवा सर्व बाबतीत उत्कृष्ट आहे. ही सेवा देशभर लोकप्रिय झाली आहे. नागपूर–पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे आहे. विद्यार्थी, व्यापारी व पर्यटकांसाठी ही सोयीची ठरणार आहे. पुण्याकडे जाताना रांजणगाव व सुपा परिसरापासून वाहतूक कोंडी सुरू होते. त्यामुळे वेळ व पैसा वाचेल आणि प्रवास अधिक सुखद व जलद होईल.

संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे महामार्ग सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. तसेच, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या विनाकारण दौंडमार्गे जाण्याऐवजी थेट पुण्यात याव्यात, यासाठी अहिल्यानगर–संभाजीनगर–पुणे असा नवीन रेल्वेमार्ग व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी खासदार निलेश लंके यांनीही मनोगत व्यक्त केले. पदमसिंह जाधव यांनी वंदे भारत रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली.या कार्यक्रमात रेल्वे विभागाच्या वतीने आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

या स्वागत प्रसंगी, खासदार निलेश लंके, भाजपचे माजी शहराध्यक्ष अभय आगरकर, पुणे रेल्वे विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदमसिंह जाधव, वरिष्ठ विभागीय अभियंता विकास कुमार, माजी महापौर अभिषेक कळमकर, अभय आगरकर, योगीराज गाडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

नागपुर अहिल्यानगर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे जंगी स्वागत केल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत अहिल्यानगर ते दौंड असा प्रवास केला. त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या उच्चस्तरीय सोयी, आधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी आसनव्यवस्था आणि वेगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

वंदे भारत सेवा नागपूर (अजनी) – अहिल्यानगर मार्गे – पुणे असा प्रवास करणार असून, आता हे अंतर फक्त १२ तासांत पूर्ण होईल. यामुळे प्रवासाचा वेळ तब्बल ५ तासांनी कमी होणार आहे. विशेष म्हणजे, नागपूर -अहिल्यानगर – पुणे ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे.या नव्या सेवेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील धार्मिक स्थळांपर्यंत पोहोच अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींनाही नवचैतन्य मिळणार आहे.
