जामखेड : जवळा येथे शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करण्याबाबत हालचाली वाढल्या ! प्रशांत शिंदे यांच्या मागणीस सभापती प्रा.राम शिंदेंचा ग्रीन सिग्नल !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक पाऊल पुढे पडताना दिसत आहे. तालुक्यात शाश्वत शेतीसाठी अत्यंत गरजेचे असलेले शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. जवळा (ता. जामखेड) येथे हे केंद्र स्थापन व्हावे यासाठी भाजपचे युवा नेते प्रशांत (भाऊ) शिंदे यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते. या मागणीनंतर प्रा. राम शिंदे यांनी कृषी विभागाकडे लेखी शिफारस केली आहे.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून “मौजे जवळा, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथे शेतकऱ्यांसाठी शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करावे तसेच पर्जन्य मापक यंत्र बसविणेबाबत उचित कार्यवाही करावी,” असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण केंद्र का आवश्यक?
जामखेड तालुक्यात सध्या एकही शासकीय माती परीक्षण केंद्र उपलब्ध नाही. परिणामी, शेतकऱ्यांना खासगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे वेळ, खर्च आणि अचूकतेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अनेक शेतकरी परीक्षणच टाळतात, ज्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होतो.

माती परीक्षणाच्या आधारे खतांचे योग्य नियोजन, पाण्याचा नियंत्रित वापर आणि पीक उत्पादकतेत वाढ करता येते. त्यामुळे तालुक्यातील शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर होऊ शकते.
युवा नेते प्रशांत शिंदे यांचा पुढाकार
जवळा येथे शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करावे या विषयावर भाजप युवा नेते प्रशांत शिंदे यांनी सहा दिवसांपुर्वी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. शिंदे यांनी हा मुद्दा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याचे सांगत, सदर केंद्र मंजुर करावे अशी आग्रही मागणी प्रा राम शिंदे यांच्याकडे केली होती. आता या मागणीला यश येताना दिसत आहे.
युवा नेते प्रशांत शिंदे यांनी केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून “मौजे जवळा, (ता. जामखेड) येथे शेतकऱ्यांसाठी शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करावे तसेच पर्जन्य मापक यंत्र बसविणेबाबत उचित कार्यवाही करावी,” असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.जवळा येथे माती परीक्षण केंद्र मंजूर झाल्यास जामखेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून स्वागत
जामखेड तालुक्यात शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर व्हावे या मागणीला स्थानिक शेतकरी वर्गातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, शेतकऱ्यांनी प्रशांत शिंदे यांच्या पुढाकाराचे स्वागत केले आहे. तालुक्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेल्या या पावलाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
जवळा येथे शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करण्याबाबत सुरू झालेल्या हालचालींचा जामखेड तालुक्यातील शेतीच्या भविष्यावर मोठा प्रभाव पडू शकतो. आता या मागणीला शासनस्तरावर मंजुरी मिळणे हे पुढचे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी जिल्हा कृषि अधिकारी यांना दिलेल्या निर्देशामुळे लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची आशा निर्माण झाली आहे.