महाराष्ट्र हादरला ! लग्न मंडपात पडला रक्ताचा सड, किरकोळ वादातून तिघांची हत्या, धुळ्याच्या पिंपळनेर-घोडेमाळ येथील धक्कादायक घटना
धुळे पिंपळनेर साक्री : मंगल अक्षता पडण्यापूर्वीच धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरच्या घोडेमाळमध्ये रक्ताचा सडा पडला. आनंदाच्या वातावरणात लग्न मंडपात मृत्यूने तांडव घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत तिघांची हत्या करण्यात आली आहे.ही धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील घोडेमाळ येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात घडली. गुजरातच्या नराधमांनी केलेल्या या खुनी हल्ल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. १९ फेब्रुवारी) दुपारी पिंपळनेर शिवारातील घोडेमाळ येथे विजू गोसावी यांच्या मुलीचा साखरपुडा आणि विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम उत्साहात सुरू असतानाच, गुजरात राज्यातील सोनगड येथून आलेल्या वऱ्हाडी मंडळींशी वधू पक्षाकडील लोकांचा वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर ठेवलेल्या एका चिथावणीखोर स्टेटसचा जाब विचारल्याने हा वाद विकोपाला गेला. शाब्दिक चकमकीचे रूपांतर काही वेळातच तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी संशयित आरोपींनी धारदार चाकूने वधू पक्षाकडील लोकांवर सपासप वार केले.
घोडेमाळ घटनेतील मृत व जखमींची नावे
या भीषण हल्ल्यात खालील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे:
१. सुरेश सुपडुगिर गोसावी (५०, रा. साक्री)
२. साहिल सुरेशगिर गोसावी (३५, रा. साक्री)
३. देवा (देवेंद्र) रवींद्र पवार (३६, रा. साक्री)
या व्यतिरिक्त दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
आरोपींना गुजरात सीमेवर फिल्मी स्टाईल अटक
घटनेनंतर संशयित आरोपी आपल्या ब्रेझा कारमधून गुजरातच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पिंपळनेर पोलिसांनी तत्परता दाखवत स्थानिक नागरिकांना वाहन क्रमांकाची माहिती दिली. ओटाबारी या गुजरात सीमेवरील घाटात पोलिसांनी कृत्रिम वाहतूक कोंडी निर्माण केली आणि संशयितांचे वाहन अडवून तिघांना ताब्यात घेतले.
- ताब्यात घेतलेले आरोपी
- कांतीलाल गोसावी (४२),
- जसवंत गोसावी (३६) आणि त्यांचा चालक (सर्व रा. सोनगड, गुजरात).
वादाचे मूळ कारण
प्राथमिक तपासात ही घटना केवळ स्टेटसवरून झालेली नसून, त्यामागे जुने कौटुंबिक आणि आर्थिक मतभेद असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गोसावी समाजातील या दोन्ही गटांमध्ये आधीपासूनच वैमनस्य होते, जे या मंगल प्रसंगी उफाळून आले.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
घटनेनंतर घोडेमाळ आणि पिंपळनेर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून “कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला आहे.
सध्या पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.