कर्जत : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, नगर – सोलापुर महामार्गावरील पाटेवाडी शिवारातील धक्कादायक घटना
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : नगर-सोलापूर महामार्गावरील पाटेवाडी शिवारात गुरुवारी (११ डिसेंबर २०२५) पहाटे अज्ञात वाहनांच्या धडकेत नर जातीचा बिबट्या ठार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मृत बिबट्यास पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीहर्ष शेवाळे यांनी याबाबत वनविभागास माहिती दिली.

नगर-सोलापूर महामार्गावर गुरुवारी (११ डिसेंबर २०२५) पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाला. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारात ही घटना घडली. नर बिबट्याचे अंदाजे वय एक ते दीड वर्षाचे आहे. बिबट्या ठार झाल्याची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी महामार्गावर तोबा गर्दी झाली होती.
यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रविण सोनवणे, वनरक्षक सुरेश भोसले, किसन नजन, विठ्ठल जानगवळी, ऋक्षिकेश लोखंडे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. कर्जतचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ राम अनभुले यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. तोंडास आणि छातीस जबर मार लागल्याने बिबट्याचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावेळी वनविभागाने मृत बिबट्यास अग्निडाग दिला.
सध्या ऊसतोडणी जोरात सुरू असल्याने बिबट्याचे स्थलांतर निदर्शनास येत असल्याने ग्रामस्थ यासह सर्वसामान्य शेतकऱ्यांनी शेतीकामे करताना विशेष काळजी घ्यावी. यासह एकटे-दुकटे न जाता समूहाने रात्री पिकांना पाणी देणे अशी कामे पार पाडावी. हातात बचावासाठी काठी कायम बाळगावी. रात्री प्रखर प्रकाशाची टॉर्च सोबत ठेवल्यास बिबट्या हल्ला करण्याची शक्यता कमी असते. परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्यास तात्काळ वनविभागास अवगत करावे असे आवाहन कर्जतचे वन परीक्षेत अधिकारी मोहन शेळके यांनी केले.