जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत आणि जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी पाटेवाडी शिवारात नर जातीच्या बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज १३ डिसेंबर रोजी मिरजगाव येथील गोरेवस्ती परिसरातील बंदिस्त कॅनाॅलच्या चारीत अडीच वर्षे वयाची बिबट्याची मादी अडकल्याची घटना उघडकीस आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

कॅनाॅलच्या अंडर ग्राऊंड चारीत अडकलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी कर्जत वनविभाग, दौंड रेस्क्यू टीम, मिरजगाव पोलिस यांच्या संयुक्त पथकाने गोरे वस्ती परिसरात सकाळी ८ वाजेपासून रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले. तब्बल सहा तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. अतिशय अवघड परिस्थिती अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीमने सुखरूप बाहेर काढत आपल्या ताब्यात घेतले. सदरची कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

बिबट्याच्या सुखरूप सुटकेनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. सदर कारवाई यशस्वीपणे राबवल्याबद्दल नागरिकांनी रेस्कु टीमचे व वनविभागाचे आभार मानले. मिरजगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस विजय झंझाड यांच्या टीमने गर्दीवर नियंत्रण मिळवत रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली.

सदरची यशस्वी कारवाई कर्जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, संकेत ऊगले यांचे मार्गदर्शनात वनपाल प्रविण सोनवणे,सचिन गांगर्डे सह वनरक्षक सुरेश भोसले, रवि राठोड, सागर वाघचौरे, शांतिनाथ सपकाळ, चंद्रकांत मरकड, नागेश तेलंगे ,दिनकर लिलके, काळे साहेब, गंगासागर गोटमुकले, चित्रा शिद, घोडके मॅडम,किसन नजन, किसन बोबडे, ऋक्षिकेश लोखंडे, माळशिखरे, महारनवर, सुर्यवंशी यांच्या पथकाने पार पाडली.

कर्जत आणि जामखेड तालुक्यात बिबट्याचे वास्तव सातत्याने उघडकीस येत असल्याने वनविभागाने या बिबट्यांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.
कर्जत आणि जामखेड तालुक्यात वनविभागाने एकुण १३ पिंजरे लावलेले आहेत. बिबट्या सदृश्य प्राणी दिल्यास नागरिकांनी वनविभागास माहिती कळवल्यानंतर आमची टीम तातडीने घटनास्थळी पोहचून पाहणी करते. आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी पिंजरा लावला जातो, नागरिकांनी भीती न बाळगता वनविभागाने दिलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे अवाहन कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी केले आहे.