जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेडमध्ये अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. सलग दुसऱ्या दिवशी जामखेड परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे.अकलूज येथील वॉटरपार्कला सहलीसाठी निघालेल्या इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांच्या भरधाव कारला जामखेड-कर्जत रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह ८ जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील इयत्ता नववी आणि दहावीत शिकणारे काही विद्यार्थी रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कारने अकलूज येथील वॉटरपार्कला सहलीसाठी निघाले होते. जामखेड शहरापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जामखेड-कर्जत रोडवरील एका अवघड वळणावर हा अपघात झाला.
कारचा वेग प्रचंड असल्याने अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली कार दोन-तीन वेळा रस्त्यावरच पलटी झाली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला (लाईटचा पोल) धडक देऊन बाजूचे तार कंपाउंड तोडून ही कार शेतात जाऊन कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
जामखेड अपघातातील जखमींची नावे खालीलप्रमाणे
- या भीषण अपघातात जामखेड शहरातील खालील विद्यार्थी व चालक जखमी झाले आहेत
- श्रेयस प्रल्हाद राजगुरू (गंभीर)
- गाडीचा चालक (गंभीर)
- चैतन्य भक्तराज राजगुरू
- ओम महेंद्र राऊत
- सौरभ बबन यवले
- साहिल अंबिका जाधव
- यश संतोष खेत्रे
- अमिन शेख
उपचार आणि सद्यस्थिती
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढले. जखमींना तातडीने जामखेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, श्रेयस प्रल्हाद राजगुरू आणि कारचा चालक या दोघांना गंभीर दुखापत झाल्यामुळे प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इतर सहा जखमींवर जामखेड येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी अपघात, हळहळ व्यक्त
जामखेड परिसरात कालही एक भीषण अपघात झाला होता आणि आज पुन्हा विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात झाल्याने शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. आनंदाने सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. या अपघातामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अवघड वळण आणि वाहनाचा वेग यामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. जामखेड पोलिस पुढील तपास करत आहेत.