जामखेड : संविधानाच्या तत्वांचा आदर आणि पालन हेच खरे राष्ट्रकर्तव्य; डॉ. दत्तात्रय सोनवणे यांचे प्रतिपादन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा: भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचा आत्मा असून, संविधानातील तत्त्वांचा आदर आणि त्याचे काटेकोर पालन करणे हेच प्रत्येक नागरिकाचे खरे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी केले.

जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आला. यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

आपल्या भाषणात डॉ. सोनवणे म्हणाले की, “२६ जानेवारी १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन तयार केलेले संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनला. केवळ उत्सव साजरा न करता, विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधून, नैतिक मूल्यांचा अंगीकार करावा. आपण आपल्या कर्तव्यांचे पालन केले, तरच देशासाठी एक प्रेरणा बनू शकतो.”

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे अभिनंदन करताना डॉ. सोनवणे यांनी विद्यापीठाच्या कार्याचा गौरव केला. विद्यापीठाने विकसित केलेले विविध पिकांचे सुधारित वाण, माती परीक्षण, जैविक खते आणि आधुनिक कृषि यंत्रे यांचा फायदा महाविद्यालय परिसरातील शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल माहिती देताना डॉ. सोनवणे यांनी सांगितले की:
- सभागृह: विधानपरिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे साहेब यांच्या प्रयत्नांमुळे महाविद्यालयासाठी १४ कोटींचे भव्य सभागृह मंजूर झाले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
- पाणी आरक्षण: मांगी मध्यम प्रकल्पातून महाविद्यालयासाठी पाणी आरक्षणाला मंजुरी मिळाली आहे, त्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.
- प्रस्तावित प्रकल्प: महाविद्यालयाच्या विकासासाठी नवीन विहीर, शेततळे, जैविक खत निर्मिती आणि फळबाग लागवड यांसारखे उपक्रम लवकरच पूर्ण केले जातील.
कार्यक्रमाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना डॉ. सोनवणे यांच्या हस्ते ‘नागरिकत्वाची प्रतिज्ञा’ बहाल करण्यात आली. तरुण पिढीमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. निकीता धाडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.