Jamkhed Kala Kendra News : खंडणीसाठी जामखेडच्या कला केंद्रावर तुफान राडा, हातात कोयता घेत सराईत गुंडांचा धुडगूस, चार जणांवर गुन्हे दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Jamkhed Kala Kendra News : जामखेड तालुक्यातील मोहा येथील रेणुका कलाकेंद्रावर सराईत गुंडांच्या एका टोळीने तुफान राडा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत गुंडांनी हातात कोयते घेत कला केंद्रावर मोठा धिंगाणा घातला. ‘दर महिन्याला एक लाखाची खंडणी द्या नाहीतर थिएटर चालू देणार नाही’ असे म्हणत या टोळक्याने कला केंद्रातील टेबल, खुर्च्या, स्कुटीची तोडफोड केली आणि कला केंद्रातील नृत्यांगणांची छेडछाड केली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारांना पोसणारे कला केंद्रच आता सराईत गुंडांच्या निशाण्यावर आले असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे.

जामखेड शहराच्या अवतीभोवती अनेक कला केंद्र आहेत. या कला केंद्रावर सर्रास काळे धंदे सुरु आहेत. राज्यातील सराईत गुन्हेगारांचा या कलाकेंद्रावर नेहमी राबता असतो, अनेक वादग्रस्त कारणांमुळे हे कलाकेंद्र नेहमी चर्चेत असतात. गुन्हेगारांना पोसणारे आणि आश्रय देणारे हक्काचे ठिकाण म्हणून या कला केंद्रांना ओळखले जाते. आता हिच कला केंद्रे गुन्हेगारांच्या निशाण्यावर आली आहेत. जामखेड येथील सराईत गुन्हेगार अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे व त्याच्या साथीदारांनी खंडणीसाठी रेणुका कला केंद्रावर मोठा राडा घातल्याची घटना घडली आहे. ही घटना आज ८ रोजी उजेडात आली आहे.
जामखेड येथील सराईत गुन्हेगार अक्षय (चिंग्या) मोरे हा आष्टी तालुक्यातील आपले साथीदार शुभम लोखंडे, सतिश टकले नागेश रेडेकर यांच्या सह रविवारी रात्री ९ च्या सुमारास जामखेड तालुक्यातील मोहा येथील रेणुका कलाकेंद्रावर गेला होता. हातात कोयते घेऊन या टोळक्याने कला केंद्रावर दहशत पसरवली. कला केंद्र मालक अनिल पवार व त्याची मुले परसु पवार, मोहीत पवार यांना गुंडाच्या टोळक्याने दमबाजी केली.
आम्हाला दर महिन्याला एक लाखाची खंडणी द्या, नाहीतर थिएटर चालू देणार नाही अशी धमकी देत या टोळक्याने कला केंद्रावर तुफान हल्ला चढवला. या हल्ल्यात थिएटर मधील खुर्च्या, टेबल व स्कुटीची तोडफोड करण्यात आली. तसेच अनेक नर्तिकींची छेडछाड करत अश्लिल वर्तन करण्यात आली. यामुळे नृत्यांगणा भीतीच्या सावटाखाली आहेत.
या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला ज्योती शिवाजी जाधव या नृतांगणाच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२), ३०८ (५), ७४,३(५) सह आर्म ॲक्ट कलम ४,२५ सह फौजदारी कायदा (सुधारणा) अधि. १९९२ चे कलम ७ अन्वये अक्षय (चिंग्या) मोरे, शुभम लोखंडे, सतिश टकले नागेश रेडेकर या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
या घटनेतील मुख्य आरोपी अक्षय ऊर्फ (चिंग्या) मोरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जामखेड व अन्य पोलीस स्टेशनला अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर जामखेड पोलिस कठोर कारवाई करणार की नेहमीप्रमाणे त्याला मोकळीक देणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
जामखेड शहराच्या लगतच्या परिसरात सुरू असलेल्या अनेक कला केंद्रांवर काळे धंदे बोकाळले आहेत. यावर आवर घालण्यासाठी जामखेड पोलिसांनी कठोर कारवाई हाती घेणे आवश्यक आहे, अशी जनतेत चर्चा आहे.