जामखेड : गांजा तस्करीचा पर्दाफाश, साडेतीन लाखांचा गांजा जप्त, दोघांना बेड्या, एलसीबी व खर्डा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात एलसीबी व खर्डा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गांजा तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल साडेतीन लाख रूपयांचा दहा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जामखेड तालुक्यातील खर्डा पोलिस स्टेशन हद्दीतील तरडगाव फाटा येथे करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पिंपरखेड येथील सचिन नवनाथ गायकवाड व खर्डा येथील सुक्षय उर्फ सोमा सुनिल काळे या दोघा गांजा तस्करांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी मोटारसायकलवरील गोणीची झडती घेतली असता त्यात गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळुन आला. सदर माल कर्जत तालुक्यातील माहिजळगांव येथील शुभम घुंगरे यांच्याकडुन विक्रीसाठा आणला असल्याचे आरोपींनी कबूल केले. घुंगरे हा फरार आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक शामसुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरुन खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशन करीत आहे. या कारवाईमुळे गांजा तस्करांचे धाबे दणाणून गेले आहे. गांजा तस्करीचा धंद्यात अनेक बडे मासे कार्यरत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा कधी उगारला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली.या पथकात पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, चालक महादेव भांड तसेच खर्डा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत, पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, शेषराव म्हस्के, बाळु खाडे, धनराज बिराजदार, शकिल बेग यांचा समावेश होता.