जामखेड: सिना नदीच्या महापुराचा विध्वंस आला समोर,बंधाऱ्याला भराव गेला वाहून, पुलावरील डांबरी रस्त्याच्या झाल्या चिंधड्या, महापुराने शेतीचे प्रचंड नुकसान
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख : सोमवारी सीना नदी व तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे सायंकाळी सीना नदीला महापुर आला होता. जामखेड तालुक्यातील चोंडी येथून वाहणार्या सीना नदीच्या पुलावरून रात्री सात ते आठ फुट पाणी वाहत होते. या महापुरामुळे नदीकाठावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महापुर इतका भीषण होता की, देवकरवाडीतील बंधाऱ्याच्या एका बाजूला मोठे भगदाड पडले. यामुळे नदीने प्रवाह बदलला. शेती व ऊस पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मंगळवारी सकाळी दहा नंतर चोंडीच्या सीना नदीचा पुर ओसरण्यास सुरूवात झाली होती. सोमवारची रात्र महापुराच्या सावटाखाली घालवलेल्या चोंडीकरांनी मंगळवारी मात्र सुटकेचा निश्वास टाकला. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास चोंडीच्या पुलावरून अर्धा ते एक फुट पाणी वाहत होते. नदीतून प्रचंड वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू होता. महापुराने नदीच्या पुलावरील डांबरी रस्त्याच्या अक्षरश: चिंधड्या केल्या आहेत. पुर ओसरल्यानंतर तातडीने या पुलाची डागडुजी हाती घ्यावी लागणार आहे.

सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे हाती घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जवळा हद्दीतील एका बंधाऱ्यालाही महापुराचा मोठा फटका बसला आहे. मोठे नुकसान झाले आहे. सीना नदीने आक्राळविक्राळ रूप धारण करत सर्वांच्याच बत्या गुल केल्या होत्या. मंगळवारी सकाळी आळजापुर- जवळा हद्दीतील सीना नदीच्या पुलाला खेटून पाणी वाहत होते.

सीना नदीला आलेला महापुर धडकी भरवणारा ठरला. सीनाच्या पाणलोटात आणखीन पाऊस झाला असता तर नदी काठच्या अनेक गावांना महापुराचा वेढा पडला असता. सीना कोळगाव व सीना या दोन्ही धरणाच्या विसर्गात समन्वय झाल्याने महापुराच्या संकटातून नदीकाठच्या गावाची सुटका झाली.
दरम्यान, मंगळवारी दुपारी चोंडीच्या सीना नदीवर अर्धा फुट पाणी होते. सीना नदी प्रचंड वेगाने वाहत होती. पुलावर पाणी असतानाही स्थानिक नागरिक, युवक, लहान मुले, मोटारसायकल स्वार, मोठे वाहन धारक धोकादायकरित्या पुलावरून येजा करत होते. दुपारनंतर प्रशासनाचा कोणताही अधिकारी व कर्मचारी चोंडीत उपस्थित नव्हता.

चोंडी येथील देवकरवाडी येथील मिलिंद देवकर यांच्या शेता शेजारी सीना नदीवर असलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीशेजारील भराव वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले. यामुळे बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसभर याच भगदाडातून प्रवास बदललेल्या नदीचे पाणी वाहत होते. या बंधाऱ्याची तातडीने दुरूस्ती हाती घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.