Independence Day 2025 : “हर घर तिरंगा” अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, तीन टप्प्यांत विविध कार्यक्रमांचे आयोजन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Independence Day 2025 : स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण राज्यात“हर घर तिरंगा” अभियान राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिले असून, २ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तीन टप्प्यांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या असून अभियान यशस्वी करण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

शासनाच्या सूचनेनुसार, “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत प्रत्येक घरावर, तसेच शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. यासाठी बचत गट, स्थानिक उत्पादक व अधिकृत पुरवठादारांकडून राष्ट्रध्वजांचा पुरवठा सुनिश्चित करण्यात येणार आहे. (Independence Day 2025)
Independence Day 2025 : “हर घर तिरंगा” अभियानाचे तीन टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:
प्रथम टप्पा (२ ते ८ ऑगस्ट): स्वयंसेवक नोंदणी, जनजागृती, शाळा-महाविद्यालयांमधील कार्यक्रम, तिरंगामय वातावरण निर्मिती.
द्वितीय टप्पा (९ ते १२ ऑगस्ट): विविध शासकीय व निमशासकीय उपक्रम, “तिरंगा मेला”, सांस्कृतिक कार्यक्रम व तिरंगा यात्रांचे आयोजन.
तृतीय टप्पा (१३ ते १५ ऑगस्ट) : प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविणे, “सेल्फी विथ तिरंगा” उपक्रम, अमृत सरोवर व सार्वजनिक स्थळांवर ध्वजारोहण.
अभियानात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी www.harghartiranga.com या संकेतस्थळावर स्वयंसेवक नोंदणी व सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींनी विशेष सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या अभियानासाठी प्रत्येक विभागांनी आपापल्या अर्थसंकल्पातूनच आवश्यक खर्च भागवावा. याशिवाय, तिरंगा रोषणाई, रंगोळी स्पर्धा, राखी निर्मिती कार्यशाळा, पत्र लेखन स्पर्धा व तिरंगा प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांच्या आयोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सदर अभियानात कोणतीही अडचण आल्यास सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या नियुक्त अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे.