महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, पटकन करा अर्ज
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारने राज्यातील ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालकांसाठी स्थापन केलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

कोणत्या योजनांचा लाभ मिळणार ?
- जीवन विमा व अपंगत्व विमा योजना,
- आरोग्यविषयक सेवा,
- कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य,
- पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना,
- तसेच कामगार कौशल्य वृद्धी योजना
- अशा विविध लाभकारी योजनांचा अर्जदारांना लाभ मिळणार आहे.
ऑनलाइन अर्ज कुठे करावा ?
धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी प्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. यासाठी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. ही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर योजनांचा लाभासाठी अर्जदार अर्ज करु शकतो.
सभासद नोंदणी करताना कोणती माहिती व कागदपत्रे आवश्यक?
- वाहनमालकाचे नाव,
- मोबाईल क्रमांक,
- जन्मतारीख,
- वाहनाचा नोंदणी क्रमांक,
- परवाना क्रमांक,
- अनुज्ञप्ती क्रमांक,
- तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती,
- रेशनकार्ड,
- आधारकार्ड,
- पॅनकार्ड
अर्जात त्रुटी असल्यास काय करावे ?
अर्जातील माहिती तपासून, सर्व अटींची पूर्तता झाल्यास अर्ज मंजूर केला जातो. अर्जामध्ये त्रुटी असल्यास ‘कार्यालयाशी संपर्क साधा’ असा संदेश प्राप्त होतो. अशा वेळी संबंधित परिवहन कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करून घ्यावी.
नोंदणी व ओळखपत्रासाठी किती फी आहे ?
नोंदणी व ओळखपत्रासाठी ५०० रुपये आणि सभासद शुल्क ३०० रुपये असे एकूण ८०० रुपये शुल्क भरणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी कोणाशी संपर्क साधावा ?
धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर प्रक्रिया पार पाडताना काही अडचण आल्यास आपल्या नजिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, या कार्यालयाकडून सदर योजनेची अंमलबजावणीत मदत करण्यात येणार आहे.
माहिती स्त्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अ. नगर