अतिवृष्टीचा फटका : जामखेड तालुक्यात ७ शेळ्या, १ गाय, १ मेंढी या ९ जनावरांचा बळी, १७ घरांची पडझड, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील अनेक भागात पावसाने तुफान बॅटींग करून पुरती दाणादाण उडवून दिली आहे. शुक्रवारी रात्री शनिवारी दिवसभर अनेक गावांना अतिमुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला यामुळे अनेक नद्यांना मोठा पुर आला आहे. हजारो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.या पावसामुळे १७ घरांची पडझड, १ मेंढी व १ गायीचा मृत्यू झाला आहे. तर आज २७ रोजी लेन्हेवाडी येथे ७ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. खर्डा परिसरातील अनेक गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.जवळा व खुरदैठण भागातील नदी काठच्या नागरिकांच्या स्थलांतराची सोय करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे खैरी नदीला महापुर आल्यामुळे शनिवारी सकाळपासूनच खैरी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु होता. यामुळे खैरी नदीने रुद्रावतार धारण करत परांडा तालुक्यात मोठा कहर केला. नदीकाठची अनेक गावे पाण्याखाली गेली.तांदुळवाडी, चिंचपुर शेळगाव या गावांना पुराचा मोठा फटका बसला.
गेल्या पाच दिवसांआसून जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार उडवून दिला आहे. सर्वच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे आगोदरच ओव्हरफ्लो असलेली धरणे, नद्या, ओढे यांचे पाणी शेतात शिरलेले आहे. पीके पाण्यात आहेत तर मोठ्या प्रमाणावर रस्ते उखडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शनिवारी दिवसभर काय घडलं?
शुक्रवारी मध्यरात्री खर्डा परिसरातील सर्वच गावांना अतिमुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शनिवारी पहाटेपासूनच या भागातील तलाव, नद्या नाले ओढ्यांना प्रचंड पाणी आल्याने या भागात महापुराची स्थिती निर्माण झाली होती. नायगाव, तेलंगशी तलाव ओसांडून वाहत आहेत. या भागात प्रचंड पाऊस झाल्याने खैरी नदीला महापूर आला होता.
या पावसामुळे दरडवाडीचा पूल पाण्याखाली गेला होता. यामुळे जामखेड तुळजापूर वाहतूक मार्ग बंद झाली होती. तसेच आनंदवाडी व बांधखडक येथील पुल पाण्याखाली गेले होते. नाहुली येथील भिलारे वस्ती पुल वाहून गेला आहे. राजुरी येथून पिंपळगाव आळवा, पिंपळगाव उंडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी होते. जामखेड तुळजापूर रस्ता ही पाण्यात होता. खर्ड्याहून तेलंगशी धामणगावला रस्ता महापुरामुळे उखडून गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. दुसरीकडे धामणगावातील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने जामखेडला जाणार रस्ता दिवसभर बंद होता. नांदणी नदीला महापुर आल्याने जवळा स्मशानभूमी पाण्याखाली गेली होती.
जामखेड तालुक्यात दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील खर्डा व धनेगाव भागातील अनेक गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जवळा व खुरदैठण भागातील नदिच्या काही कुटुंबाला जर गरज पडली तर त्यांच्या स्थलांतराची सोय गावातील मंदिर, ग्रामपंचायत व शाळांमध्ये करुन ठेवली आहे.
जवळा गावातील नांदणी नदी व सिना नदीच्या कडेला असलेल्या सर्व वस्त्या व घरे यांना सूचित करण्यात येत आहे की पाण्याचा प्रवाह वाढत आहे. गावातील मारुती मंदिर परिसर, कुंभार गल्ली, वाळुंजकर गल्ली, भीमनगर, मातंग वस्ती येथील नागरिकांची “श्री. जवळेश्वर मंदिर भक्त निवास” व “नवीन ग्रामपंचायत” येथे राहण्याची सोय केली आहे. नागरिकांनी तेथे जाऊन थांबावे, असे अवाहन जवळा ग्रामपंचायतने केले होते.
जामखेड तालुक्यात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर झालेल्या अतिमुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक गावांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसून शेती, घरे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे.
मृत्यूमुखी पडलेली जनावरे
लेहनेवाडी : शेतकरी शरद प्रभाकर पवार यांच्या ७ शेळ्या मृत्यूमुखी
भवरवाडी : पोपट अण्णा शिंदे यांची गाय वाहून गेली
मोहा : कैलास सजगणे यांची १ मेंढी ओढ्यात वाहून गेली
घरांची पडझड व नुकसान
जामखेड तालुक्यात १७ घरांची पडझड
अनेक घरांत पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान
घोडेगाव, खुरदैठण, मोहरी, राजुरी, शिऊर, मुंजेवाडी, वंजारवाडी, तरडगाव वाघा येथे घरांचे नुकसान
शेती पाण्याखाली
हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
उभे पीक पूर्णतः बुडाले
शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
वाहतूक विस्कळीत
दरडवाडी पूल पाण्याखाली – जामखेड-तुळजापूर मार्ग बंद
आनंदवाडी व बांधखडक येथील पूल पाण्याखाली
नाहुली येथील भिलारे वस्तीचा पूल वाहून गेला
खर्डा–तेलंगशी–धामणगाव रस्ता महापुरामुळे बंद
प्रशासनाचा इशारा व स्थलांतर
जवळा व खुरदैठण भागातील नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा
जवळा ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी श्री. जवळेश्वर मंदिर भक्त निवास व नवीन ग्रामपंचायत कार्यालय येथे निवारा उपलब्ध करून दिला
खैरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
गावोगाव पुराचा कहर
खैरी नदीला महापूर – परांडा तालुक्यात तांडव
तांदुळवाडी, चिंचपूर शेळगाव पाण्याखाली
नायगाव, तेलंगशी तलाव ओसंडून वाहत
जवळा स्मशानभूमी पाण्याखाली
👉 बळीराजा मोठ्या संकटात – गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून मदत व नुकसानभरपाईची मागणी होत आहे.