International Women’s Day : महिलांनी स्वता:च्या अरोग्याबाबत जागरूक राहून यशाकडे वाटचाल करावी – सपना सुसे कानडे
महिला दिनानिमित्त हाळगाव कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना निरोगी आरोग्य व यशाचा कानमंत्र
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : “महिलांना दैनंदिन जीवनात विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. हे करत असताना स्वतःचे आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. निरोगी आरोग्य हीच खऱ्या अर्थाने यशाची गुरुकिल्ली असून, महिलांनी समतोल आहार आणि व्यायामाच्या जोडीने यशाकडे वाटचाल करावी,” असे आवाहन अहिल्यानगर येथील जागतिक आरोग्य सल्लागार सपना सुसे कानडे यांनी केले.

हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिना’निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सपना सुसे कानडे पुढे म्हणाल्या की, “महिलांच्या आयुष्यात निरोगी जीवनशैलीचे अनेक फायदे आहेत. स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहिल्यास कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याचे बळ मिळते.”

अध्यक्षीय भाषणात डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी महिलांमधील कलागुणांचा गौरव केला. “शिक्षणासोबतच आत्मविश्वास, कष्ट आणि सकारात्मक विचार अंगी बाणवल्यास भविष्यातील आव्हानात्मक संधींचे सोने करता येईल,” असे सांगत त्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका, विद्यार्थिनी आणि महिला सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थिनी अंजली गायवळ व प्रीती कवळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या सोहळ्याला विद्यार्थी परिषद उपाध्यक्षा डॉ. प्रेरणा भोसले, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट पवार, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनोज गुड, डॉ. निकीता धाडगे, डॉ. धनेश्वर पाटील, कर्मचारी अनिता पुराणे यांच्यासह महाविद्यालयातील महिला कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रेरणा भोसले यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. निकिता धाडगे यांनी करून दिला. सूत्रसंचालन वैष्णवी खाडे व पायल देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप नम्रता कदम यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.