परतीच्या पावसाने घेतले चौघांचे बळी ! पुरात तिघे जण वाहून गेले तर वीज कोसळून एक जण ठार, शिरूर कासार तालुक्यातील घटनेने बीड जिल्हा हादरला !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 20 ऑक्टोबर 2022 । बीड जिल्ह्यातील परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. परतीच्या पावसामुळे नदीला पुर आल्याने तीन जण वाहून गेले आहेत तर वीज कोसळून एक जण मयत झाल्याची दुर्दैवी घटना शिरूर कासार तालुक्यातून आज उघडकीस आली आहे. या घटनेने बीड जिल्हा हादरून गेला आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्याला आज ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे  रोंद नदीला पूर आला होता. याच पुरामध्ये तीन जण वाहून गेल्याची घटना समोर आलीय. ही घटना शिरूर तालुक्यातील रायमोह जवळील भानकवाडी येथे घडली आहे. या घटनेत दोन मुलींसह एक तरूण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

मुलींचे मृतदेह सापडले, तरुण अद्याप बेपत्ता

दरम्यान शोध कार्यानंतर स्वरा कुंडलिक सोनसळे (वय 12) आणि छकुली कुंडलिक सोनसळे (वय 9) या  दोन लहान मुलींचे मृतदेह सापडले आहे, तर 30 वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता आहे. मयत मुली या सख्ख्या बहिणी आहेत. तर 30 वर्षीय साईनाथ भोसले हा तरुण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे.

Four killed in return rains, three swept away in floods, one killed by lightning, incident in Shirur Kasar taluk shakes Beed district, Beed rain news

नदीच्या पाण्यातून घराकडे चालल्या होत्या मुली

रायमोह जवळील भनकवाडी येथे रोंद नदीवर पूल नाही. यामुळे भनकवाडी येथील गावकऱ्यांना नदीच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागते. मयत दोघी बहिणीही शेतावर गेल्या होत्या. शेतातून नदीच्या पाण्यातून त्या आपल्या वस्तीकडे चालल्या होत्या. मात्र नदीतून जात असतानाच अचानक पाण्याचा लोंढा आला आणि मुली वाहून जाऊन लागल्या.

मुलींना वाचवण्यासाठी तरुणाने पाण्यात उडी घेतली

यावेळी तेथे उपस्थित साईनाथ भोसले या तरुणाने मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरले. दोघी बहिणींचा मृ्त्यू झाला तर साईनाथ अद्याप बेपत्ता आहे. यावेळी नदीच्या आसपास असलेले इतर ग्रामस्थही गोळा झाले मात्र पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की, ते कोणालाही वाचवू शकले नाही.

वीज कोसळून एक ठार

दरम्यान, दुसर्‍या एका घटनेत वीज कोसळून एक जण ठार झाला आहे. ही घटना भनकवाडी परिसरातील दगडवाडी येथे घडली. या घटनेत शेतात काम करत असलेले रावसाहेब जायभाये या 55 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, भनकवाडी परिसरात रोंद नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरूणाच्या शोधासाठी NDRF ची टीम बोलवण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी दिली.