E Pik Pahani 2025 : ई पीक पाहणीच्या मोबाईल ॲपमध्ये झाले मोठे बदल, शेतकऱ्यांसाठी नोंदणी होणार आता अधिक जलद, अचूक आणि… पटकन जाणून घ्या नवीन अपडेट

E Pik Pahani 2025 : राज्यात खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) अ‍ॅपमध्ये यंदा काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामुळे नोंदणी अधिक अचूक, त्रुटीमुक्त आणि वेळ वाचवणारी होणार आहे. शेतकरी स्तरावरील नोंदणी १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे आणि अंतिम मुदत १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. (e pik pahani app new update 2025)

e peek pahani, kharif 2025, DCS, e pik pahani app new updates 2025, registration for farmers will now be faster, more accurate, know in detail,

खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी ई-पीक पाहणी मोहिमेला गती आली आहे. आतापर्यंत राज्यातील ९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नोंदणी पूर्ण झाली असून ९ लाख ५७ हजार १७७ शेतकऱ्यांनी आपली पिकांची माहिती या डिजिटल पद्धतीने दिली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाईल अ‍ॅपद्वारे ही नोंदणी होत आहे.

e pik pahani app new update 2025 : ई पिक पाहणी ॲपमध्ये काय बदलले?

फोटो अंतराची अट ५० मी. वरून २० मी : पिकाचा फोटो आता प्रत्यक्ष लागवडीपासून २० मीटरच्या आतून घ्यावा लागेल. त्यामुळे लोकेशन मॅचिंग अधिक तंतोतंत होईल.

एकदाच ओटीपी: वारंवार OTP टाकण्याची गरज नाही; एकदाच OTP देऊन संपूर्ण नोंदणी पूर्ण करता येईल.

ऑफलाइन मोड: इंटरनेट नसतानाही माहिती भरता येईल आणि नंतर नेटवर्क मिळाल्यावर अपलोड करता येईल.

४८ तास दुरुस्तीची मुभा: नोंदणी सबमिट केल्यानंतर पुढील ४८ तास माहिती दुरुस्त करता येईल.

अ‍ॅपचे नवे अपडेट : अ‍ॅपचे ताजे अपडेट जुलै अखेरीस जारी झाले असून कार्यक्षमता व स्थिरता सुधारली आहे.

शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ काय ?

पीकविमा/अनुदानासाठी खात्रीशीर नोंद : ई-पीक पाहणीतील नोंदणी हा पीकविमा प्रक्रियेचा पाया असल्याने नुकसानभरपाई आणि योजनांचे लाभ अधिक पारदर्शक होतील. याबाबत राज्य शासनाने ई-पीक पाहणीची नोंद विम्यासाठी बंधनकारक केल्याची तरतूदही अधोरेखित आहे.

वेळ व त्रास कमी : एकदाच OTP, ऑफलाइन भरती आणि ४८ तास एडिट विंडोमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल; वारंवार तालुका/कार्यालयात जाण्याची गरज कमी होईल.

आतापर्यंतची प्रगती (विभागनिहाय)

राज्यात ९,५७,१७७ शेतकऱ्यांनी ९,०२,८३० हेक्टर क्षेत्राची नोंदणी केली आहे. त्यात संभाजीनगर विभाग आघाडीवर आहे.

  • अमरावती – १,८१,८५५.९२ हे.
  • कोकण – २८,२६७.०५ हे.
  • संभाजीनगर – २,५०,७१६.१९ हे.
  • नागपूर – १,७१,६०६.१२ हे.
  • नाशिक – १,६१,५४५.०९ हे.
  • पुणे – १,०८,८३९.६३ हे.

मोबाईलमध्ये अशी करा ई पिक पाहणी नोंदणी

  • अ‍ॅपमध्ये लॉगिन करा (एकदाच OTP).
  • गट क्रमांक निवडा आणि शेतात २० मी. आतून फोटो घ्या.
  • पीक प्रकार/क्षेत्रफळ भरा, बांधावरील झाडे/पडीत क्षेत्र असल्यास नोंदवा.
  • इंटरनेट नसेल तरी सेव्ह करा; नेटवर्क मिळाल्यावर अपलोड करा.
  • काही चूक आढळल्यास ४८ तासांत दुरुस्ती करा.

ई-पीक पाहणी का महत्वाची?

  1. पीक विमा मिळवण्यासाठी आवश्यक – शेतकऱ्याने कोणते पीक किती क्षेत्रात लावले आहे याची अचूक माहिती शासनाकडे गेल्याशिवाय पिक विमा मिळत नाही.
  2. शासकीय योजनांचा लाभ – पीक कर्ज, अनुदान, मदत योजनांसाठी पीक नोंदणी अत्यावश्यक आहे.
  3. अचूकता व पारदर्शकता – मोबाइल अॅपमुळे थेट शेतातून फोटो, माहिती जाते. त्यामुळे मध्यस्थ किंवा चुकीच्या नोंदीला आळा बसतो.
  4. वेळ व खर्चाची बचत – ऑनलाइन नोंदणीमुळे शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात जाण्याची गरज राहत नाही.